1
 


Movie Review
TTMM तुझं तू माझं मी:चित्रपट वाईट नाही. पण नाविन्यही काही नाही.


ललित प्रभाकर हा प्रेम कथेसाठी चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. पण ललितने एकसारख्या भूमिका स्वीकारु नये. गेल्या महिन्यात त्याचा चि. व. चि. सौ. कां हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तुझं तू माझं मी आणि चि. व. चि. सौ. कां या चित्रपटात बरंच साम्य आहे. दोन्ही चित्रपटात ललितची भूमिकाही साधारण तशीच आहे. पुष्कर लोणारकर हा मुलगा दोन्ही चित्रपटात हिरोइनचा भाऊ आहे आणि दोन्ही चित्रपटात त्याला मोबाईलचं वेड आहे. दोन्ही चित्रपटाचा विषय हा लग्न आहे. योगायोग म्हणावा की आखणी काही; दोन्ही चित्रपटात विनोदी आणि लहान भूमिकेत भारत गणेशपुरे आहेत. या दोन चित्रपटातला महत्वाचा फरक म्हणजे चि. व. चि. सौ. कां हा चित्रपट पुष्कळ विनोदी आहे. म्हणून त्यातील प्रत्येक पात्र विनोद निमिर्ती करतं. तुझं तू माझं मी हा चित्रपट वास्तविक आहे. त्यात विनोद ओघाने येतो. असो. ही खरंच खुप चंगली बाब आहे की मराठी चित्रपट प्रेमकथेकडे वळत आहे. मला नेहमी असं वाटत राहतं की मराठीत चांगले ऍक्शन (दाक्षिणात्य चित्रपटांसारखे ऍक्शन मुळीच नको), सस्पेन्स, थ्रिलर, गुप्तहेर किंवा बॉण्डपटासारखे चित्रपट तयार व्हायला हवेत. केवळ सामाजिक विषयांपुरते मराठी चित्रपटांनी मर्यादेत राहू नये. त्याची सुरुवात म्हणून मराठीत चांगले रोमॅंटिक चित्रपट निघत आहेत. 
 
जय (ललित) आणि राजश्री (नेहा) या दोघांनाही लग्नात रस नाही. जयला जग प्रवास करायचा आहे. त्याने याआधी अनेक देश पाहिले आहेत आणि राजश्रीला वाटतं की इतक्या लवकर लग्न करु नये. दोघांचे घरच्यांना त्यांच्या मुलांचं लग्न लावायचं आहे. तेव्हा जय त्याच्या लग्नाच्या मंडपातून पळून जातो आणि दुसरीकडे राजश्रीही पळून जाते. त्या दोघांची भेट गोव्याला जाण्यार्‍या बसमध्ये होते. पुढे काय होतं हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटाची सुरुवात जय आणि राजश्रीच्या लग्नाच्या रिसेप्शनने होते. त्यावेळचे त्यांचे हावभाव बघून आपल्याला स्पष्ट कळतं की ते दोघेही नाखुश आहेत. पण मग आपल्याला प्रश्न पडतो की ते लग्न का करतायत? हे आपल्याला फ्लॅश बॅकच्या माध्यमातून कळतं. मध्यांतर आधीची कथा मूळ विषयाला हात न घालता ते दोघे एकमेकांना कसे भेटतात, ते एकत्र कसे वेळ घालवतात यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे. मध्यांतरानंतर कथेला वळण येतं आणि नायक व नायिका आणि त्यांचे घरचे यांच्या भावभावनांतून कथा पुढे सरकते आणि अर्थात चित्रपट संपतो. 
 
सबंध चित्रपट आपण पाहिल्यावर एक गोष्ट जाणवते की चित्रपट खरंच चांगला आहे. चि. व. चि. सौ. कां आणि तुझं तू माझं मी या दोन्ही चित्रपटांचा विषय जरी लग्न असला तरी मराठी चित्रपटांसाठी हे विषय ताजे आहेत. पण मला या चित्रपटातल्या काही गोष्टी खटकल्या त्या अशा; जयला जग फिरण्याचा छंद आहे. म्हणूनच त्याचा लग्नाला विरोध असतो. पण ज्या मुलीशी त्याचं लग्नं ठरलेलं असतं ती मुलगी त्याची मैत्रीण असते आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यात जय हा श्रीमंत बापाचा मुलगा. त्याला जर लग्न करायचंच नव्हतं तर त्याला तसा कुणी विरोध केला असता असं वाटत नाही. त्याचे बाबा जरी सुरुवतीला खाष्ट दाखवले असले तरी तो पळून गेल्यानंतर त्यांचे हावभाव विशेष त्यांना खुप मोठा धक्का बसलाय किंवा ते भयंकर चिडलेत असे नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलगी जर त्याची मैत्रीण आहे, तर तो तिलाही सांगू शकत असता की त्याला हे लग्न नाही करायचंय. उगाच फिल्मी परिस्थिती निर्माण करण्याची गरज नव्हती. हिंदी चित्रपटात हिरो हिरोइन पळून जाणे हे सामान्य आहे. त्यात जयला वेगवेगळे देश फिरण्याचा छंद आहे आणि तो पळून जाऊन गोव्याला जातो. त्याच्या बोलण्यावरुन त्याला विविध ठिकाणाचे वैशिष्ट्ये पाहण्यास आवडतं. मग गोव्याला जाऊन तो काय करणार होता? त्या क्षणी केवळ त्याला घरच्यांपासून दूर जायचे आहे, हे जरी मानले तरी गोवा कुठेतरी खटकतं. दुसरीकडे राजश्री सुद्धा घर सोडून जाते तेही सहसा मनाला पटत नाही. असो. महत्वाचं म्हणजे दोघे एकमेकांना भेटतात त्यावर खुप वेळ खर्च करण्यात आला आहे. मध्यातरानंतर चित्रपटाला रंगत येते. मानवी स्वभाव उलगडणार असं आपल्याला वाटू लागतं. पण त्यावर विशेष काम करण्यात आलेलं नाही. म्हणजे चित्रपटाचा अंतरात्मा, अर्थात कथेत जे काही घडतंय त्याचं मूळ कारण काय आहे? पाया काय आहे? हे समजत नाही. म्हणजे चित्रपतातील पात्र असे का वागतात, याचं स्पष्टीकरण येत नाही. मानवी भाव उलगडले पाहिजेत. दोघांच्या पहिल्या भेटीवर खुप वेळ खर्च केल्यामुळे जो मुख्य विषय आहे, त्याला पुरेसा न्याय मिळालेला नाही. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटून राहतं. जी काही परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे, ती फार काही वेगळी नाही. आपल्याला हे सर्व माहिती आहे. यात नाविन्य असं काही नाही. 
 
पण तरीही चित्रपट वाईट नाही. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांची लहान पण चांगली भूमिका आहे. दोघेही "चला हवा येऊ द्या"चे शिलेदार आहेत. पण दोघांचे एकत्र सीन्स नाहीत. तसं पाहायला गेलं तर या चित्रपटात सागर हा सेकंड लीड आहे असं म्हणायला हरकत नाही. पण नायक आणि नायिकेवर अधिक प्रकाश टाकल्यामुळे त्याची भूमिका दुय्यम वाटते. अर्थात दोघांनीही चांगलं काम केलं आहे. चित्रपटाचं संगीतही चांगलं आहे. छायांकन उत्कृष्ट आहे. दिग्दर्शन सुद्धा सुंदर आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांचे काम चोख केले आहे. नेहमीप्रमाणे नेहाने सुद्धा आपली भूमिका चांगलीच निभावली आहे. पुष्कर लोणारकर हा चांगला बालकलाकार आहे. पण मी म्हटलं तसं यात वेगळेपण नाही. चित्रपट सुरु होतो आणि संपतो. क्लायमॅक्स सुद्धा सहज येऊन गेल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्समुळे पुढची उत्सुकता राहत नाही. चित्रपटाचा शेवट काय असेल, हे ओळखणं सोपं जातं. जर चित्रपटाच्या संहितेवर थोडे जास्त काम केले असते. तर चित्रपट उत्कृष्ट झाला असता. 
पण जाता जाता मला पुन्हा एकदा सांगवंसं वाटतं की ललित प्रभाकरने वेगवेगळ्या भूमिका स्वीकाराव्यात. असो. आपण या चित्रपटाला अडीच स्टार्स देऊया.


   जयेश मेस्त्री

.

Click here to Top