1
 


पुष्कर मनोहरMovie Review
कनिका:नावापुरती कनिका


कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन: पुष्कर मनोहर
 
भयपटांची महत्वाची अट असते ती म्हणजे प्रेक्षकांना भीती वाटली पाहिजे. पण आजकालचे भयपट हे प्रेक्षकांना घाबरवत नाही तर काही सीन्सपुरते दचवतात. त्याचे महत्वाचे कारण बर्‍याचशा भयपटांचे सीन्स हे पुर्वीच्या भयपटांच्या सिन्सची कॉपी असतात. आरशात भूताचे प्रतिबिंब न दिसणे, अचानक भूत समोर येणे, लाईट्स बंद चालू होणे हे सर्व भयपटांमध्ये सामान्य सीन्स आहेत. तसेच सीन्स कनिकामध्ये सुद्धा आहेत. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे भीती वाटते, काही दृश्यांमुळे प्रेक्षक दचकतात. पण त्यामुळे हा काही भयपट होत नाही. कारण भयपटाला पुरेशी अशी कथा लागते. जी दृश्यांना बांधून ठेवते. पण कनिकाची कथा अगदी सामान्य आहे आणि ती या घाबरवणार्‍या दृश्यांपासून वेगळी आहे. प्रत्येक वेळी लोकांचं प्रबोधनच केलं पाहिजे असा काही नियम नाही. केवळ मनोरंजन हा शुद्ध हेतू असायला हरकत नाही. या चित्रपटात हाच गोंधळ झाला आहे. भयपटही बनवायचा आहे आणि लोकांचं प्रबोधनही करायचं आहे. त्यामुळे यापैकी कोणताही हेतू साध्य झालेला नाही. 
 
कथा हा चित्रपटाचा पाया असतो आणि इथे हा पायाच ढासळलेला आहे. डॉक्टर कौशिक (पोंक्षे) हा एक हॉस्पिटल चालवत असतो. त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नसताना त्याला त्यांनी शिकवून डॉक्टर बनवलं. आता कौशिकला पैसाच महत्वाचा वाटतो. कितीही पैसा कमवला तरी त्याला कमीच आहे, अशी त्याची वृत्ती. त्याच्या भूतकाळाच्या काही चुकांमुळे कनिका नावाच्या लहान मुलीचं भूत त्याला त्रास देतं. अशी ही कथा आहे. गंमत म्हणजे कनिकाचं भूत कौशिक आणि त्याच्या चुकांमध्ये सहभागी असलेल्या मित्रांनाच दिसतं आणि त्यांनाच त्रास देतं. पण चित्रपटाच्या सुरुवातीलाच ते भूत कौशिकच्या वॉचमनला दिसतं आणि त्याला त्रास देतं. ते असं का करतं? हे कळतच नाही. वॉचमन घाबरुन पगार घेऊन लगेच गावाला निघून जातो. हे सर्व कौशिकच्या समोर घडलेलं असतं. तरीही कौशिक दुसर्‍या दिवशी सकाळी वॉचमनला हाक मारतो. तेव्हा त्याला दुसर्‍याकडून कळतं की वॉचमन गावाला निघून गेलाय. ही लेखनातली किती मोठी चूक? अशा चुका वारंवार झालेल्या आहेत. कौशिकचं प्रोफेशन आणि लहान मुलीच्या भूताचं आगमन यामुळेच मूळ कथा काय असेल? आणि कौशिककडून कोणती चूक झाली असेल याचा अंदाज चित्रपटाच्या दहाव्या मिनिटाला लावता येतो. त्यामुळे उलगडत जाणारी कथा आपल्याला धक्का देत नाही. कौशिक भूत दिसल्यावर नेहमी घाबरतो. पण दुसर्‍या दिवशी इतका नॉर्मल असतो की जणू काही घडलंच नाही. कौशिक आणि त्याच्या मित्राला एकदम भूत दिसतं. तेव्हा ते दोघेही प्रचंड घाबरतात. पण दुसर्‍या दिवशी या प्रकरणाची चर्चा ते स्वीमींग पूलच्या बाजूला बसून ज्यूस पीत, अशा काही रिलॅक्स मूडमध्ये करतात, जणू काही एका नवतरुणीच्या सौंदर्याची चर्चा करत आहेत. 
 
एकाच शहरात राहणारे व रोज संपर्कात असणारे कौशिक आणि त्याची एक सहकारी डॉक्टर जी एक लॅब चालवते. ती मरते, हे कौशिकला तीन दिवस झाल्यानंतरही कळत नाही. त्याचा पोलिस मित्र येऊन त्याला सांगतो की ती मेलीय. कहर म्हणजे कौशिकचा एक डॉक्टर मित्र म्हणजेच त्याचा पार्टनर भारताबाहेर फिरायला गेलेला असतो. त्याला आणायला त्यांचा एक सहकारी जातो, तेव्हा कारमध्ये सहकारी आणि तो डॉक्टर मित्रच असतात. पण नंतर तो मित्र जेव्हा कौशिकला भेटायला येतो, तेव्हा कौशिकच्या बायकोशी जे संवाद होतात, त्यात कळतं की तो मित्र त्याच्या कुटुंबासोबत भारताबाहेर गेलेला असतो. मग त्या कारमध्ये ते का नसतात? कदाचित हा हॉरर चित्रपट आहेत, म्हणून ते प्रेक्षकांना दिसत नसावे. गम्मत अशी की कौशिक हॉस्पिटलमध्ये असतो म्हणून तो त्याला बघायला तातडीने भारतात येतो. तर हा भाई दोन तीन दिवसांनंतर कौशिकच्या घरी येतो. कौशिक आपल्या गुन्ह्याची कबुली घराच्या टेरेसवर बायकोला देतो. तर बायको निघून जाताना म्हणते, एक बायको म्हणून थांबले तरी एक स्त्री म्हणून थांबू शकत नाही. पण लगेच ती त्याच्या शेजारी झोपलेली दाखवली आहे. मग ती नेमकी कुठे निघून जाते? आणि निघून गेली तर लगेच येऊन झोपली कशी? काही काही कळत नाही. त्यांचा एक डॉक्टर मित्र मरतो, जो त्यांच्या तोही गुन्ह्यात सहभागी असतो. त्याला मरुन एक महीना होतो. पण कौशिकला आणि त्याच्या मित्रांना त्याबद्दल काहीच कळत नाही. विशेष म्हणजे हा मेलेला डॉक्टर मित्र, आपले पेशेंट कौशिककडे पाठवत असतो. कौशिकच्या परिस्थिमुळे त्याची बायको त्रस्त झालेली असते. ती त्याला एका डॉक्टरचं नाव सुचवत म्हणते की आपण त्याच्याकडे ट्रिटमेंट घेऊ. तो मानसोपचारतज्ञ असतो. तेव्हा कौशिक म्हणतो की तो माझा जुनियर होता, माझी कॉपी करुन पास झाला. आता जुनियर सिनियरची कॉपी कशी करु शकतो? आणि प्रेक्षकांना घाबरायला लावणारा सर्वात भयानक धक्का म्हणजे, ज्या डॉक्टरला कौशिक आपला ज्युनियर आहे असे संबोधतो, तो डॉक्टर चक्क म्हातारा निघतो. म्हणजे तो कौशिकच्या वडीलांच्या वयाचा वगैरे असावा असे वाटते. काही माणसं म्हातारे लवकर होतात किंवा कौशिक सारखे काही लोक म्हातारपणीही खुप तरुण दिसत असतात. असो. या चित्रपटात कौशिकला एक मुलगी आहे. ती सुरुवातीच्या एका सीनमध्ये दिसते आणि नंतर शेअवटच्या दोन सीनमध्ये दिसते. तिचा या चित्रपटात काहीच रोल नाही. बापाला एक भूत त्रास देतंय, त्याचा मुलीवर काहीच परिणाम होत नाही? तिला नावापुरतं घेण्यात काय अर्थ होता? मला तर वेगळीच शंका आहे. पहिल्या दोन सीन्समधली कौशिकची मुलगी आणि शेवटच्या सीनमधली मुलगी या दोन वेगळ्या अभिनेत्री आहेत. असा माझा अंदाज आहे. अर्थात हे तपासण्यासाठी चित्रपट पुन्हा पाहावा लागेल. या चित्रपटात कौशिकचा जो पोलिस मित्र आहे, तोही नावापुरताच आहे. कौशिक त्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसाला सांगतो. तेव्हा पोलिस मित्र म्हणतो की जर ते भूत तुला त्रास देत असेल तर बरोबरच करतंय. अरे? पोलिस म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? अजून गम्मत म्हणजे, आधी जेव्हा हे भूत कौशिकला त्रास द्यायचं तेव्हा कौशिक तसा नॉर्मल असायचा. भूत दिसलं की घाबरायचा, नंतर एकदम नॉर्मल. पण कनिकाची आई जेव्हा सांगते की तुला मृत्यूपेक्षा भयंकर शिक्षा मिळणार आहे. तेव्हा मात्र कौशिक वेड्यासारखा वागायला लागतो. कमाल आहे ना? आणि महत्वाचं, ते जे बिचारं भूत आहे कनिकाचं. ते या चित्रपतात फक्त नावापुरतं आहे. बदला तर जीवंत आईच्या सांगण्यावरुन घेत असते, असं पाहताना तरी वाटतं. भूताच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. ते येतं, दचकवतं, घाबरवतं, जीव घेतं आणि निघून जातं. त्यामुळे हा रुढार्थाने भयपट वाटत नाही. 
 
अभिनेत्यांची अभिनय व्यवस्थित केला आहे. भूताचं मेकअप चांगलं आहे. भूताचे काही शॉट्स चांगले घेतलेत. पण कथा वेगळी हवी होती आणि पटकथेवर, विशेषतः संवादावर चांगलं काम होणं गरजेचं होतं. कारण यातील संवाद बर्‍याचदा पचका करणारे आहेत. बर्‍याच दिवसांनी मराठीत एक भूताचा चित्रपट आला आहे. अजून काही चांगले भयपट येतील अशी अपेक्षा करुया. 
 


   जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.

Click here to Top