1
 


मनस्विनी लता रविंद्र
पटकथा/संवाद


Movie Review
ती सध्या काय करते? (Marathi):प्रेमकथा सांगण्याची वेगळी पद्धत...


ती सध्या काय करते?
 
प्रेमकथा सांगण्याची वेगळी पद्धत...
 
कलाकार: अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, हृदीत्य राजवाडे, निर्मोही अग्निहोत्री, इशा फडके, प्रसाद बर्वे, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष, उमिला कोठारे.
कथा/दिग्दर्शक: सतिश राजवाडे
पटकथा/संवाद: मनस्विनी लता रविंद्र
 
 
 
 
अनेक प्रेमकथा येऊन गेल्या आहेत. अनेक येत आहेत. साधारणतः बर्‍याच चित्रपटांच्या कथेत साम्य असतं. पण पटकथा व्यवस्थित बांधली गेली तर चित्रपट आकर्षित होतो. "ती सध्या काय करते" या चित्रपटाची कथा अगदी साधी सरळ आहे. अन्या (हृदीत्य) आणि तन्वी (निर्मोही) शालेय जीवनात असताना भेटतात आणि पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र अन्याला (अभिनय) इतर मुली आवडू लागतात. असं काहीतरी होतं ज्यामुळे तन्वी (आर्या) अन्यापासून दूर जाते. ते मोठे होतात, त्यांचं लग्न होतं आणि पुन्हा एकदा अन्या (अंकुश) आणि तन्वी (तेजश्री) समोरासमोर येतात. आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय होतं? हे सांगणारी कथा म्हणजे "ती सध्या काय करते"...
 
तुमची स्टोरी लाइन म्हणजे मूळ कथा कशी आहे? हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच तुम्ही ती कथा कशाप्रकारे सांगता हे खुप महत्वाचं आहे. एखादी साधी कथा एखादा माणूस खुप रंगवून आणि मनोरंजक पद्धतीने सांगू शकतो. इथे अगदी तेच सतिश राजवाडे यांनी केलंय. सतिश राजवाडे यांची कथा सांगण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत आहे. मग असंभव किंवा अग्निहोत्र या मालिका असोत किंवा गैर, मुंबई पुणे मुंबई सारखे सिनेमे असोत. ते स्वतःच्या विशिष्ट शैलीने प्रेक्षकांना बांधून ठेवतात. कथा संगण्याच्या या वेगळ्या पद्धतीमुळे हा सिनेमा तग धरतो. या सिनेमाची बांधणी सुद्धा साधी आणि सोपी आहे. त्यांच्या क्लासच्या रियुनियनसाठी सगळे मित्र एकत्र येतात. पण तन्वी मात्र येत नाही. अन्याला तन्वीचा फोटो दिसतो आणि अन्या जुन्या आठवणीत हरवून जातो आणि अन्या आपली कथा प्रेक्षकांना सांगू लागतो. अन्याच्या दृष्टीकोनातून ही कथा पुढे जाते आणि मग भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड लेखक व दिग्दर्शक घालतात. 
 
हा सिनेमा प्रदर्शित होणार याची अनेक जण प्रतिक्षा करीत होते. याचे मुख्य कारण म्हणजे जुनियर बेर्डे अर्थात लक्षीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डॆ. अभिनय बेर्डे लक्ष्यासारखा दिसतो. पण त्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. त्याने केलेलं काम समाधानकारक आहे. तो नाचतोही चांगला. अजून त्याला बरंच काम करायचं आहे. अभिनयच्या रुपात मराठी सिनेमाला एक हॅंडसम हिरो मिळालाय. आर्या आंबेकरचं काम सुद्धा समाधानकारक झालं आहे. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि इतर सर्व कलाकारांचं काम उत्तम झालंय. ऊर्मिला कोठारेने कंट्रोल्ड अभिनय केलाय. लहान भूमिकेतही चांगलं काम केलं आहे. चित्रपटाची पटकथा चांगली जमून आली आहे. परंतु कथा तुकड्या तुकड्यात पुढे जाते. त्याचं कारण सिनियर अन्या (अंकुश) हा स्टोरीटेलर आहे. सीन सुरु असताना अन्याचं निवेदनही सुरु असतं. पण ते निवेदन तुटक वाटत नाही. काही प्रसंगात तर या निवेदनामुळे चित्रपटगृहात हशा पसरतो. अंकुश चौधरींचं काम तर फारच उत्तम झालंय. चित्रपट तीन भागात विभागला आहे. अन्या आणि तन्वीचं बालपण, कॉलेजचं आयुष्य आणि तरुणपण. यातील बालपणाचा भाग चांगला झाला आहे. पण बालवयातील प्रेमावरील काही चित्रपट आत्ताच होऊन गेले असल्यामुळे यात विशेष नाविन्य वाटत नाही. अर्थात वेगळेपण निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. बालपणीचं प्रेम दाखवताना कोणताही पांचटपणा दाखवलेला नाही. म्हणून ते प्रेम निरागस वाटतं. हे सगळं पाहताना आपणही आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो. कॉलेज जीवनाचा भाग बरा झाला आहे. त्यात अजून वेगळेपण आले असते तर मजा आली असती. त्यांचं तरुणपण अंकुश आणि तेजश्रीने सुंदर रंगवलं आहे. तरुणपणीच्या भागात थोडे गांभिर्य आहे आणि तो भाग अधिक convincing वाटतो. त्यात आधीच्या दोन भागांचं सार या तिसर्‍या भागात आहे. हे तीन भाग दाखवताना एकच समस्या झाली आहे. ती अशी की बालपणीचा अन्या, कॉलेज जीवनात अगदी वेगळा दिसतो आणि तरुणपणी तर खुपच वेगळा. म्हणजे हृदीत्य, अभिनय आणि अंकुश यांच्या चेहर्‍यात जरा सुद्धा साम्य नाही. तसेच तन्वीच्या बाबतीत झालं आहे. लहानपणीची तन्वी म्हणजे निर्मोही खुप गोरी पान, पाणेरी डोळे गोंडस अशी आहे. आर्याचा लूक निर्मोहीपेक्षा खुप वेगळा आहे. तसेच तेजश्री सुद्धा निर्मोही आणि आर्यापेक्षा फारच वेगळी दिसते. त्यामुळे जीवनातील तीन टप्पे दाखवताना व्यक्तिचित्रण चुकले आहे. 
 
चित्रपटातील गाणी चांगली आहेत. तरुणांना भुरळ पाडणारी असली तरी धांगडधिंगा नाही. "ह्रदयात वाजे समथिंग" हे गाणं तर खुपच गाजत आहे. चित्रपटाचा एंडींग खरोखरच खुप चांगला आहे. अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते की चित्रपटाची कथा भरकटत नाही. सुरुवातीपासून अखेरपर्यंत स्टोरी लाईन धरुन ठेवली आहे. अर्थात हे क्रेडिट सतिश राजवाडे आणि मनस्विनी लता रविंद्र यांचं आहे. चित्रपटात अपेक्षित असा थोडासा सस्पेन्स राखला जातो. अन्याने नक्की कोणाशी लग्न केलं हे खुप उशीरा कळतं. त्यामुळे अन्याच्या मैत्रिणींपैकी नक्की त्याने कोणाशी लग्न केलंय, याची उत्सुकता आपल्याला लागून राहते. तन्वी आणि अन्या वेगळे कसे झाले, याचीही उत्सुकता ताणून धरली आहे. एक साधी, सरळ, सोपी कथा असूनही कथा सांगण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे सिनेमा ताजा वाटतो. पहिलं प्रेम विसरता येत नाही, याचं स्पष्टीकरण सुंदर आहे आणि चित्रपटाचा शेवटही गोड आहे, पण वेगळा आहे, तरीही प्रॅक्टिकल आहे. प्रेमकथेचा असा शेवट तुम्ही आधी पाहिला नसेल. हा शेवट कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावंच लागेल. चित्रपट पाहताना त्यातील पात्रांशी आपण कनेक्ट होतो. विशेषतः अन्या आणि तन्वी हे आपलंच पात्र आहे असं वाटतं. एकंदर हा एक चांगला रोमॅंटिक, फॅमेली पॅकेज असलेला सिनेमा आहे. चित्रपट पाहिल्यावर तुम्हालाही असा प्रश्न पडेल "ती सध्या काय करते?" आपण या चित्रपटाला साडे तीन स्टार्स देऊयात.
 
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री


   जयेश शत्रुघ्न मेस्

. www.jayeshmestry.in

Click here to Top