1
 


VentilatorRajesh Mapuskar
Writer/Director


Movie Review
Ventilator:व्हेंटिलेटरवर असलेली नाती...


व्हेंटिलेटरवर असलेली नाती...

कलाकार: आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने, सतीश आळेकर, स्वाती चिटणीस, निखिल रत्नपारखी, विजू खोटे, नम्रता आवटे, राहुल पेठे, अभिजित चव्हाण, निलेश दिवेकर, शशांक शेंडे, नारायण जाधव आणि बरेच
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन: राजेश मापुसकर

अनेक कलाकारांना घेऊन काम करणे तसे कठीण आहे. त्याहूनही कठीण त्यांच्याकडून चांगलं काम करवून घेणं. व्हेंटिलेटरमध्ये पुष्कळ कलाकार आहेत. ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. पण सगळेच कलाकार एस्टाब्लिश होतात असे नाही. ते एस्टाब्लिश व्हावेत असा अट्टाहासही नसावा. सिनेमाची दुसरी जमेची बाजू म्हणजे परफेक्ट कास्टिंग. प्रत्येक कलाकार हा त्या रोलसाठी बनलेला आहे असं वाटतं. चांगली कास्टिंग करणे हे खुप महत्वाचे आणि परिश्रमाचे काम असते. त्यात इतके गुणी कलाकार जमवणे म्हणजे तारेवरची कसरतच.

व्हेंटिलेटरची कथा अगदी साधी आहे. गजानन कामेरकर - गजू काकांना ब्रेन हॅमरेज होते आणि त्यांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतो. ही बातमी राजा कामेरकरला कळते (आशुतोष गोवारीकर) तेव्हा तो दादासोबत (संजीव शाह) तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. ही बातमी गजू काकांच्या सर्व नातेवाइकांना कळते आणि मुंबई-कोकण-कोल्हापूरचे नातेवाइक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि तिथे उलगडतो नात्यांचा प्रवास. नाती प्रेमळ आणि स्वार्थी असतात हे चित्रपटात प्रामुख्याने तरीही विनोदी ढंगाने दर्शवण्यात आलं आहे.  

जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर, सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने, सतीश आळेकर, स्वाती चिटणीस, निखिल रत्नपारखी, विजू खोटे, नम्रता आवटे, राहुल पेठे, अभिजित चव्हाण या दमदार कलाकारांच्या सोबतीला प्रियंका चोप्रा आणि बोमन इराणी यांचे स्पेशल अपियरेन्स आहे. पसन्नाला राजकारणात करिअर करायचे आहे. पण त्याचे बाबा अर्थात गजू काकांना त्याचं राजकारणात असणं आवडत नाही. म्हणून त्या दोघांमध्ये संघर्ष आहे. पण सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार गजू काका व्हेंटिलेटरवर असल्यामुळे हा संघर्ष आपल्याला संवादाच्या माध्यमातून कळतो. नवीन आणि जुनी पिढी असा हा संघर्ष आहे. मग हा संघर्ष प्रतीकात्मकरीत्या राजा आणि त्याच्या वडीलांच्या (सतीश आळेकर) मार्फत दाखवण्यात आलेला आहे. पण राजा बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक असल्यामुळे हा संघर्ष केवळ काही ठराविक मतभेदांपुरता मर्यादित राहतो. दुसरीकडे प्रसन्ना हा अजूनही यशस्वी झालेला नाही. त्याची स्ट्रगल सुरु आहे. त्यामुळे त्याचा आणि त्याच्या वडीलांमधील संघर्षाला अर्थ आहे जो संवादाच्या स्वरुपात आपल्याला चित्रपटाच्या क्लायमेक्सपर्यंत जाणवतो. तरीही राजा आणि त्याच्या वडीलांमधील संघर्ष सुद्धा महत्वाचा आहेच. कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच नाती घडतात आणि बिघडतात. आपल्या हळू हळू कळतं की नाती सुद्धा व्हेंटिलेटरवर आहेत.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे या चित्रपटातून आपल्याला बारकाइने दिसतं. चित्रपटात अनेक पात्र असूनही संवाद लेखनात गोंधळ झालेला नाही. प्रत्येक पात्राच्या संवादाची शैली वेगळी आहे. वागण्याची पद्धत निराळी आहे. चित्रपट पाहताना पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीची आठवण होते. कॅरेक्ट डेव्हेलपमेंट हा जो प्रकार असतो तो मापुसकरांनी चांगलाच साधलाय. सिनेमाची पटकथाही गंमतीदार, मनोरंजक आणि पुढे पुढे सरकणारी आहे. पटकथा रेंगाळलेली नाही. कंटाळवाणी तर अजिबात नाही. निखिल रत्नपारखी, अभिजित चव्हाण, नम्रता आवटे, विजू खोटे यांची खास विनोदी ढंगातली एंट्री आहे. यामुळे गंमत येते. इथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की जरी चित्रपट विनोदी अंगाने पुढे जात असला तरी विनोद करण्याचा अट्टाहास केलेला नाही. कलाकारांनी केलेला विनोद हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग वाटतो. त्यामुळे तो सहज होतो. दिग्दर्शन तर उत्तमच आहे. अभिनय म्हणाल तर सर्व कलाकारांनी आपलं best दिलंय. आशुतोष गोवारीकर बर्‍याच वर्षानंतर पुन्हा अभिनेते म्हणून दिसले आणि ते सुद्धा मराठी सिनेमात हे सुखदायक आहे. दिपक शिर्के यांचीही छोटीशी आणि चांगली भूमिका आहे. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात बरेच पात्र असल्यामुळे थिएटरमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःचं एक कॅरेक्टर चित्रपटात सापडू शकेल. एक साधी सरळ कथा २ तास २३ मिनिटात मनोरंजक पद्धतीने मांडता येते हे राजेश मापुसकरांनी दाखवून दिलं आहे. चित्रपटातली गाणी आधीच हिट झाली आहेत. मला चित्रपटाचा शेवट ज्या पद्धतीने आटोपला ते पटलं नाही. आधी म्हटल्याप्रमाणे अनेक पात्र डेव्हेलप झाले असले तरी सगळेच पात्र एस्टाब्लिश करता आले नाही. अर्थात लेखकाला ती स्क्रीप्टची गरज वाटली नसेल. असो. शेवट अजून जरा वेगळा करता आला असता म्हणजे. राजाच्या बाबांचं लॉजिक खरं ठरलं या मुद्द्यावर बोलतोय मी. असो. बाकी चित्रपट अतिशय मनोरंजक, फुल्ल फॅमेली पॅकेज आहे. बर्‍याच दिवसांनी सिनेमागृहात मराठी चित्रपटाकरिता इतके प्रेक्षक पाहून मला आनंद झाला. राजेश मापुसकर आणि संपूर्ण व्हेंटिलेटर टीमला आपण ४ स्टार्स देऊया...

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री  

www.jayeshmestry.in   जयेश शत्रुघ्न मेस्

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.

Click here to Top