1
 


Jaundyana BalasahebGirish KulkarniMovie Review
JAUNDYA NA BALASAHEB:नेमकं काय सांगायचंय बाळासाहेब?


Star Cast : Girish Kulkarni, Sai Tamhankar, Mohan Joshi, Dilip Prabhavalkar, Reema, Manava Naik, Bhau Kadam, Srikant Yadav, Spruha Joshi, Kishore Chaugule, Savita Prabhune

Director/Story & Screenplay: Girish Kulkarni

गिरीश कुलकर्णींचा देऊळ आपल्या सर्वांना नक्कीच आठवत असेल. गिरीश कुलकर्णी हे उत्तम स्क्रीन-रायटर आहेत. वळू, विहीर, देऊळ, मसाला असे सुंदर आणि आशयप्रधान सिनेमे त्यांनी या आधी दिले आहेत. आता जाऊंद्याना बाळासाहेब या चित्रपटाद्वारे त्यांनी लेखन, अभिनय आणि महत्वाचं म्हणजे दिग्दर्शकाची भूमिकाही स्वीकारली आहे. बाळासाहेब मारणे (गिरीश कुलकर्णी) यांची ही कहाणी. त्यांचे वडील माजी आमदार, वडीलोपार्जीत श्रीमंती यामुळे बाळासाहेब मनमौजी आहेत. पण काही राजकीय मदभेदांमुळे त्यांचं ठरलेलं लग्न मोडतं आणि बाळासाहेबांच्या मनावर आघात होतो. बाळासाहेब या आघातामुळे त्रस्त होतात, दारु प्यायला लागतात. पण बाळासाहेब मनाने अगदी चांगला माणूस. या त्यांच्या चांगुलपणाचा फायदा त्याचें दोन जीवलग(?) मित्र जीवन (किशोर चौघुले), विकास (श्रीकांत यादव) उचलत असतात. बाळासाहेबांच्या नावाचा वापर करुन स्वतःचा फायदा कसा होईल हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. बाळासाहेबांचा या दोघांवरही जीव आहे. बाळासाहेबांचे वडील, अण्णासाहेबांना (मोहन जोशी) बाळासाहेबांनी राजकारणात यावं असं वाटत असतं. पण अण्णासाहेबांचं भ्रष्ट राजकारण बाळासाहेबांना पटत नाही. एके दिवशी त्यांची गाठ ऊर्मीशी (मनवा नाईक) पडते. ते ऊर्मीच्या अभिनय कार्यशाळेत सहभागी होतात. त्या कार्यशाळेचा त्यांच्यावर इतका परिणाम होतो की ते स्वतःच एक नाटक बसवायचं ठरवतात आणि मग हे नाटक कशाप्रकारे बसवलं जातं, काय अडचणी येतात, अखेर नाटकाचा प्रयोग होतो की नाही हा प्रवास म्हणजेच जाऊंद्याना बाळासाहेब. 

या चित्रपटाचे ट्रेलर्स आणि गाणी तुम्ही पाहिली असतील तर तुमच्या लक्षात येईल की चित्रपट मुळात विनोदी आहे. गिरीश कुलकर्णी यांची एक विशिष्ट शैली आहे. ते एका साधारण कथेला सामाजिक आशय देतात किंवा साधारण कथेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतात. मग देऊळ असो किंवा वळू असो हे चित्रपट हसत खेळत सामाजिक संदेश देऊन जातात. हाच प्रयोग जाऊंद्याना बाळासाहेब या चित्रपटात करण्यात आला आहे. पण दुर्दैवाने तो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. याचं कारण या चित्रपटातून अनेक विषय हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या मनावर झालेला आघात, नाटक, फेमिनिज्म, भ्रष्टाचार, गरीबी, शेतकर्‍यांच्या समस्या, दिशाभूल तरुण पिढी, गलिच्छ राजकारण इ. अनेक विषय चित्रपटात मांडण्यात आले आहेत आणि या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे नाटकातून जनजागृती. हा सिनेमा पावणेतीन तासांचा आहे. मध्यांतराच्या आधी विनोदनिर्मितीला अधिक महत्व देण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या वैयक्तीक जीवनाभोवती हे कथानक फिरत राहतं. उत्तम अभिनय, हसायला लावणारे विनोद, प्रेक्षणीय गाणी असं या चित्रपटाचं समीकरण असलं तरी या चित्रपटात काहीतरी कमतरता आहे. 

जीवन आणि विकास हे बांळासाहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतात. पण पुण्यात अभिनयाच्या एका वर्कशॉपमध्ये भाग घेतल्यानंतर अचानक ते बदलतात. इतके बदलतात की बाळासाहेबांसाठी नाटक बसवतात आणि शेवटी तर चक्क सामाजिक व राजकीय बदल घडवण्यापर्यंत मजल जाते. बाळासाहेब हे नाटक ऊर्मीवर इंप्रेशन जमवण्यासाठी करतात. पण अचानक झटपट गोष्टी इतक्या बदलतात की ते स्वीकारणं कठीण होऊन जातं. जीवन हा सरकारी कर्मचारी आणि हौशी लेखक आहे. पण विकासला नाटकाचं कोणतंही अंग नसताना, दूर दूरपर्यंत नाटकाशी काहीही संबंध नसताना तो नाटकाचं दिग्दर्शन करतो आणि नाटकातले आणि अभिनयाचे बारकावे समजवून सांगतो हे काही पटत नाही. नाटकाच्या माध्यमातून क्रांती ही संकल्पना चांगलीच आहे. पण नाटकातही क्रांती दिसून येत नाही आणि प्रत्यक्ष सिनेमातही कोणत्याही प्रकारची क्रांती किंवा बदल दिसून येत नाही. सिनेमाच्या शेवटी घडणारी क्रांती काहीशी अनपेक्षित आणि पटकन घडलेली आहे. त्यामुळे आपलं मन त्या क्रांतीचा स्वीकार करत नाही. फर्स्ट हाफमध्ये बाळासाहेबांच्या वैयक्तीक आयुष्यावर जास्त फोकस करण्यात आला असल्यामुळे क्रांतीची चाहूल सुरुवातीपासून लागत नाही. ती लागली नाही तरी चालेल. क्लायमॅक्ससाठी ठेवली तरी चालेल. पण स्टोरी लाईन अचानकपणे बदलून जाते. बाळासाहेबांच्या पर्सनल समस्येवर भाष्य करणारा सिनेमा अचानक देशातल्या समस्यांबद्दल बोलायला लागतो. हे इतकं अचानक आणि अनपेक्षित घडतं म्हणून ते रुचत नाही. रंग दे बसंती सारखा चांगला सिनेमा याआधी हिंदीत येऊन गेला आहे. मनमौजी मुलं देसभक्त कसे होतात हा प्रवास त्यांनी दाखवला आहे. असो. 
 
बाळासाहेबांचे वडील अण्णासाहेब हे भ्रष्ट आहेत, हे सुद्धा प्रकर्षाने जाणवत नाही. काही प्रसंगातून तसा उल्लेख होतो. ते भ्रष्ट आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. पण त्यांचा भ्रष्टाचार नेगेटिव्ह शेडमध्ये जात नाही. नाटक बंद पाडण्यासाठी त्यांनी टाकलेला दबाव सौम्य वाटतो. त्यामुळे जो शेवट होतो, तो शेवट हरवल्यासारखा वाटतो. ऊर्मी ही बंडखोर मुलगी आहे. राजकीय अस्थिरतेबद्दल आणि तानाशाहीबद्दल ती बाळासाहेबांना बर्‍याच गोष्टी सांगते. त्याचा बाळासाहेबांच्या मनावर परिणाम होतो. आपण स्वतः काहीतरी कर्तृत्व करुन दाखवावं असं त्यांना वाटू लागतं. त्यासाठी बाळासाहेब त्यांच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करतात. पण ते प्रयत्न पटकथेतून दिसत नाहीत. ऊर्मी हे महत्वाचं पात्र असूनही तिला फारसं महत्व दिलेलं नाही. बाळासाबांच्या टोळीने बसवलेलं नाटकही छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो सारखं झालंय. त्यामुळे ती मजा निघून जाते. हे विनोद आपण रोज टिव्हीवर घरबसल्या पाहतो. एमएसईबीत कामाला असलेला झटक्या (भाऊ कदम) आणि बाळासाहेबांची बालमैत्रीण करिश्मा (सई ताम्हणकर) सुद्धा या नाटकात काम करतात. तिचं बाळासाहेबांवर लहानपणापासून प्रेम आहे. त्यामुळे प्रेम हा अजून एक विषय चित्रपटाला जोडला गेला आहे. ही एका अर्थाने प्रेम कहाणी सुद्धा आहे. बरेच विषय एकमेकांना येऊन आदळतात त्यामुळे चित्रपटाची स्टोरी लाईन कळत नाही. 

चित्रपटाची गाणी प्रेक्षणीय आहेत. पण या गाण्यांचा सिनेमाशी थेट संबंध नाही. त्यामुळे गाणी चित्रपटाला पुढे ढकलत नाहीत. मोहन जोशी, रीमा लागू, किशोर चौघुले, श्रीकांत यादव, सई ताम्हणकर, भाऊ कदम, मनवा नाईक आणि गिरीश कुलकर्णी अशी भन्नाट कास्ट या चित्रपटाला लाभली आहे. पण मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्या भूमिकेकडे फारसं लक्ष देण्यात आलेलं नाही. तरी या सर्व दमदार कलावंतांच्या अभिनयामुळे चित्रपट मनोरंजक वाटतो. थिएटरमध्ये प्रेक्षक हसतात आणि नंतर रडतातही. ही किमया अभिनेत्यांची आहे. स्वतः गिरीश कुलकर्णी यांनी सादर केलेला बाळासाहेब अप्रतिम आहे. बाळासाहेबांचा इनोसेन्स, त्यांचा चेंजओव्हर कुलकर्णींनी उत्तम दाखवला आहे. प्ले अंडर प्ले करताना अभिनेते नसल्याचा अभिनय सर्वांनी जबरदस्त केला आहे. "मी शब्द शोधितो" हा संवाद/कविता गिरीश कुलकर्णींनी भन्नाट म्हटला आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णींमधला लेखक सतत जाणवत राहतो. या सिनेमात लेखक आणि दिग्दर्शकाला सामाजिक संदेश द्यायचा आहे. पण चित्रपटात तो संदेश निसटल्यासारखा वाटतो. बाळासाहेबांना नेमकं काय सांगायचंय हेच उमगत नाही. तरीही चित्रपट मनोरंजक आहे. हा गिरीश कुलकर्णी-स्टाईल सिनेमा आहे. आपण या चित्रपटाला अडीच स्टार्स देऊया...

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

www.jayeshmestry.in    जयेश शत्रुघ्न मेस्

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.

Click here to Top