1
 


KanhaAvadhoot Gupte
Writer/Director


Movie Review
Kanha :गुप्ते नेमके काय खुपते?


CAST: Vaibhav Tatwawdi, Gashmir Mahajani, Prasad Oak, Kiran Karmarkar, Gauri Nalawade, Sumedh Vaani
DIRECTION: Avdhoot Gupte
Writer: Sachin Darekar, Avadhoot Gupte
Screenplay/Dialogues: Sachin Darekar, Swapnil Gangurde

अवधुत गुप्ते यांचा एक तारा या चित्रपटानंतर कान्हा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. एक तारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नव्हता. कान्हा हा चित्रपट मोरया चित्रपटाची कार्बन कॉपी आहे. तिथे गणेशोत्सव आणि इथे गोकुळाष्टमी एवढाच फरक आहे. पण मोरया चित्रपटाच्या तुलनेने हा चित्रपट खुप मागे पडतो. जय बजरंग पथकाचा प्रमुख मल्हार (वैभव) आणि जय एकता पथकाचा प्रमुख रघू (गश्मीर) यांच्यातील संघर्ष म्हणजे कान्हा, असं आपल्याला ट्रेलर पाहिल्यावर वाटतं. पण असं मुळीच नाही. कारण त्या दोघांमधला संघर्ष अपुरा दाखवला आहे. जय एकता पथक ९ थर लावण्याचा विश्वविक्रम करतो. आता मल्हारच्या जय बजरंग पथकाला हा विश्वविक्रम मोडायचा आहे. पण अडचण अशी आहे की कोर्टाने २० फुटाचं बंधन घातलंय. पण अनपेक्षितपणे जय बजरंग पथकाकडून ९ थर लावले जातात आणि हे मंडळ प्रकाशझोतात येतं. गोकुळाष्टमीला हे पथक कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून ९ थर लावतात आणि कान्हाला (सुमेध) खाली पडून गंभीर दुखापत होते. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. पण नंतर कळतं की कान्हाचा अपघात झालेला नसून कुणीतरी मुद्दामुन त्याला मारण्यचा प्रयत्न केला आहे. कान्हा हा अनाथ मुलगा आहे. मल्हारने त्याला दत्तक घेतलेलं आहे. शेवटी व्हिलन पकडला जातो. हिरो व्हिलनला बेदम मारतो. वगैरे वगैरे... 

चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीमुळे चित्रपटात पुढे काय होईल हि उत्सुकता लागून राहते. पण नंतर मात्र आपली साफ निराशा होते. अवधुत गुप्तेंचा झेंडा, मोरया आणि कान्हा हे विषय सहजासहजी कुणी हाताळलेले नाही. काही महिन्यांपूर्वी स्वप्नील जोशींचा गोविंदा हा सिनेमा आला होता. हा एक अपवाद आहे. जरी विषय चांगला असला तरी गुप्तेंना या विषयाला उत्तम न्याय देता आलं नाही. चित्रपटाची पटकथा जाणूनबुजुन निर्माण केलेली वाटते. कन्नी (गौरी) जीममध्ये ट्रेनर आहे. तिच्याकडे एक जाडी मुलगी येते व तिला ट्रेन करायला सांगते. त्यावेळी गौरी म्हणते की तू बारीक होऊन काय करणार? नटणार, मग रस्त्यावर उभी राहणार व पोरं तुला पाहणार. तुझ्यासारख्या मुलींमुळे इतर मुलींना सहन करावं लागतं, अशा प्रकारचा ती संवाद म्हणते. या संवादाला काय अर्थ आहे? ती ट्रेनिंग घ्यायला आली आहे, तिने पैसे दिले आहेत. तर तिला ट्रेन करावं ना. हा लांबलचक संवाद मारण्यात काय अर्थ आहे? हा संवाद आणि ही पटकथा हिरोईनला इंट्रोड्य़ूस करण्यासाठी लिहिली आहे. यात हिरोईन डॅशिंग वगैरे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मल्हारची आजी दारु पिताना दाखवली आहे. ती मालवणी बोलते. पण मल्हारचे उच्चार अधून मधून देशावरचे वाटतात. याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. दुसरी गोष्ट आजीला बेवडी दाखवण्यात नेमका काय हेतू होता? आजी अगदी व्यवस्थितपणे बाटली आणि चकना घेऊन बसते. हे जरा हास्यास्पद वाटतं. मल्हार आणि रघूमधील संघर्ष सुद्धा स्पष्ट होत नाही. नेहमी रघू मल्हारकडून मार खातो. तरीही रघू हा बॉडीबिल्डर आणि मधू भाईचा (किरण करमरकरचा) उजवा हात आहे. एरियामध्ये रघूची वट आहे. मधू भाई हा स्थानिक गुंड आहे. त्याला आता राजकारणात प्रवेश करायचा आहे. दही हंडी उत्सव करण्यामध्ये मधू भाईला भरपूर स्वारस्य आहे. पण आमदार विश्वासराव (प्रसाद ओक) दहीहंडीत इतकं स्वारस्य का दाखवतो? पहिल्यांदा जय बजरंग पथक ९ थर लावतात ते विश्वासरावच्या कार्यक्रमात. तेव्हा विश्वासराव ९ थर लावण्यासाठी टोकाची भूमिका घेतो. पत्रकार त्याला विचारतात, तेव्हा विश्वासराव म्हणतो की मला पक्षाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल. दही हंडी आणि पक्षात जर कोणाची निवड करायची झाली तर मी दही हंडीची निवड करीन. या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यावा? दही हंडी हा सात्विक, पारंपारिक उत्सव आहे म्हणून विश्वासराव हि भूमिका घेतो? नेमकं काय कारण आहे? कारण विश्वासरावांची प्रतिमा लेखक, दिग्दर्शकाने चांगली दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांचा हेतू शुद्ध आहे हे स्पष्ट आहे. पण दही हंडीसाठी स्वतःची राजकीय कारकीर्द तो पणाला का लावतो? 

चांगल्या उत्सवाला राजकीय रंग चढल्यामुळे त्या उत्सवाचं स्वरुप बदललं आहे असं सांगण्याचा खटाटोप झालेला आहे. पण ते चित्रिकरणातून सशक्तपणे दाखवलेलं नाही. दही हंडीसारख्या उत्सवांमध्ये जे राजकारण चालतं त्याचं वर्णन सुद्धा विस्तृतपणे केलेलं नाही. कान्हा उंचावरुन खाली पडल्यावर पत्रकार मल्हारला हॉस्पिटलच्या बाहेर ज्या अभिव्यक्तीने, ज्या अविर्भावाने प्रश्न विचारते. ते अविर्भाव वैयक्तीक ममत्व दाखवणारे आहेत. असं तिने का केलं? कान्हा उंचावरुन पडून जखमी होतो. म्हणून पोलिस मल्हारला पकडून नेतात व एखाद्या सराईत गुन्हेगाराला जसं मारतात, तसं त्याला मारतात. असं का? त्यानंतर चित्रपटाची हिरोईन ज्या प्रकारे पत्रकारांसमोर मल्हारची आणि गोविंदा पथकाची बाजू मांडते ती न पटणारी आहे. असे संवाद बर्‍याच ठिकाणी आले आहेत. म्हणून संवाद अनेकदा निरर्थक आणि कंटाळवाणे झाले आहेत. एके ठिकाणी मल्हार म्हणतो की लहान पोरांना उंचावर चढवू नये असा कायदा आहे. मग १८ व्या वर्षी ही पोरं जेव्हा ८० किलोची होती तेव्हा त्यांना खांद्यावर कोण घेणार, कायदा? दुसर्‍या एका संवादात कोर्टाने घातलेल्या बंदीचा विरोध करण्यासाठी असे संदर्भ आले आहेत की सुनिल गावस्करने रेकॉर्ड केला. त्यानंतर जर क्रिकेटवर काही बंधनं किंवा बंदी आली असती तर सचिन तेंडूलकर हा जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर झाला नसता, तो कुठेतरी क्रिकेट शिकवत असता. हि जी तुलना केली आहे ती का केली आहे? ती अक्षरशः अतार्कीक आहे. एके ठिकाणी कान्हाच्या तोंडी संवाद दिला आहे की क्रिकेटप्रमाणे दहीहंडीला खेळ म्हणून मान्यता का मिळत नाही. दही हंडी स्टेडियममध्ये का होत नाही. असे अजून काही संवाद चित्रपटात आले आहेत. पण ते सुद्धा निरर्थक आहेत. दही हंडी हा जर खेळ म्हणून समोर आला, तर मी तरी या खेळाचं स्वागत करीन. पण रस्त्यावर उत्सव म्हणून साजरा केला जाणार्‍या दहीहंडीला खेळाचा दर्जा कसा मिळू शकेल? याचं विवेचन सिनेमात करण्यात आलेलं नाही. जे काही मुद्दे दाखवण्यात आलेले आहेत ते असंबद्ध आहेत. कान्हाला मारण्याचा प्रयत्न होतो. पण कान्हाला मारण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. प्रसाद ओक अचानकपणे चित्रपटातून गायब होतात. ते नंतर दिसतंच नाहीत. दही हंडी मल्हारचं passion आहे. पण त्याला उंचीची भिती वाटते. असे बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात.

सिनेमातली गाणी ठीक आहेत. विशेष प्रभाव पाडत नाही. एक चांगलं दही हंडीचं गाणं, जे अजून ५० वर्ष लक्षात राहिल, प्रत्येक दही हंडी पथकात वाजवलं जाईल, असं गाणं या चित्रपटात नाही. चित्रपटात चांगली स्टार कास्ट आहे. गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, गौरी नलावडे, किरण करमरकर, प्रसाद ओक. गश्मीरचं काम बरं झालंय. पण त्याच्या कामापेक्षा त्याचे मसल्स अधिक चांगले आहेत. ते दिग्दर्शकाने दाखवलेले आहेत. गश्मीरला वैभवच्या तुलनेत कमी वाव देण्यात आलेला आहे. तो सिनेमाचा second lead वाटत नाही. गौरीला आपण मालिकांमध्ये पाहिलं आहे. ती चांगली अभिनेत्री आहे. पण या पात्राला तिला चांगला न्याय देता आलेला नाही. प्रसाद ओक यांची भूमिक नेहमीप्रमाणे उत्तम झाली आहे. प्रत्येक पात्र वेगवेगळ्या पद्धतीने रंगवण्यात ते समर्थ आहेत. किरण करमरकर यांनी वेगळी बेअरिंग पकडली आहे. पण कधी कधी ते पात्र अती विचित्र असल्यासारखं वाटतं. इतर सर्व कलाकारांचं काम चांगलं झालंय. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे वैभव तत्ववादी. नेहमीप्रमाणे वैभवचं काम उत्तम झालं आहे. वैभवने बरेच बरे-वाईट चित्रपट केले आहेत. त्या सर्व चित्रपटांत त्याची भूमिका खुलून आली आहे. आताच्या तरुण पिढीतला वैभव हा मराठी चित्रपटातला चांगला व्यावसायिक अभिनेता आहे. मुळात कान्हा या चित्रपटाने वैभवच्या सशक्त खांद्यावर थर लावला आहे. पण चित्रपटात जसा कान्हा कोसळतो, तसा कान्हा चित्रपट कोसळणार नाही, याची शाश्वती देता येणार नाही. 

अवधुत गुप्ते हे "मराठी माणूस" आहेत. त्यांना ठाकरे कुटुंबाविषयी ममत्व आहे. त्यामुळे चित्रपटात शिवसेनेचे बॅनर दिसतात. त्यांच्या चित्रपटाचे विषय सुद्धा महाराष्ट्राच्या टिपिकल राजकारबद्दल असतात. असो. चित्रपट संपतो आणि स्क्रीनवर पाटी दिसते कोर्टाने २० फुटाची मर्यादा सांगितली आहे. पण आपण रडायचं नाय, आता चढायचं... या चित्रपटातून अवधुत गुप्ते यांना नेमकं काय सांगायचं आहे? कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवायचा असा संदेश त्यांना द्यायचा आहे का? हे सांगण्यासाठी त्यांनी हा चित्रपट काढला आहे का? गुप्तेंना नेमके काय खुपते? हे व्यवस्थितपणे कळलेलं नाही. असो. आपण या चित्रपटाला दीड स्टार्स देऊया.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

www.jayeshmestry.in    जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.

Click here to Top