1
 


Disco Sannya
ठिकाय


Niyaz Muzawar
Writer/Director


Movie Review
Disco Sannya:ठिकाय, डिस्को सन्या


कलाकार : पार्थ भालेराव, संजय खापरे, चित्रा खरे, सुहास शिरसाट, गौरी कोंगे, उमेश जगताप

संवाद/दिग्दर्शन    : नियाज मुजावर 
कथा/पटकथा : नियाज मुजावर, सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर  

पार्थ भालेरावला आपण याआधी बर्‍याचदा पाहिलंय. किल्ला, लालबागची राणी आणि बच्चन साहेबांसोबत केलेला भूतनाथ रिटर्न्स, यामुळे पार्थ प्रकाशझोतात आला. एक बाल-कलाकार म्हणून त्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. आता पार्थ डिस्को सन्या बनून आपल्या समोर आलाय. 

डिस्को सन्याची कथा साधारण अशी आहे, डिस्को सन्या (पार्थ) झोपडपट्टीत राहणारा एक अनाथ मुलगा आहे. हार-फुलं विकून तो स्वतःचं पोट भरतो. एकदा श्रेयस काळेची (संयय खापरे) गाडी रस्त्यावर थांबलेली असताना सन्या त्याला हार घेण्यास सांगतो. श्रेयसने अनेकदा "नाही" म्हटलेलं असताना सुद्धा सन्या हारप पुन्हा पुन्हा त्याला विनवणी करतो. शीघ्रकोपी असलेला श्रेयस रागाच्या भरात सन्याच्या मुस्कटात मारतो. तेव्हा सन्या श्रेयसला चांगलीच अद्दल घडवायची, असं ठरवतो. 

तर सन्या श्रेयसला कशाप्रकारे धडा शिकवतो, त्याला कसं वठणीवर आणतो, याची कहाणी म्हणजे डिस्को सन्या. सिनेमाची कथा मनोरंजक आहे. प्रत्येक वेळी वास्तववादी सिनेमे बनवायलाच पाहिजे अशी काही अट नाही. पण कलिप्त गोष्ट सुद्धा मनाला पटालया हवी. गंमत जंमत करत सिनेमा पुढे जातो आणि शेवटी कथेतील सस्पेन्स उघड होतं. डिस्को सन्यामधील उघड होणार सस्पेन्स पटकन मनाला पटत नाही. पण बर्‍याच सिनेमात एक साधारण व्यक्तीचं पात्र निभावणारा हिरो जेव्हा १५-२० जणांना ढिशुम ढिशुम एकदम बदडतो, तेव्हा डिस्को सन्याचं सस्पेन्स मनाला बळजबरीने पटवून घ्यायला हरकत नाही, असं वाटतं. तरीही अनेक संवाद आणि पटकथा मनाला पटत नाही. श्रेयसच्या घरी जेवणात रोज बर्गर असतं म्हणे. कसं शक्य आहे? माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो व्यवस्थित जेवणारच ना? तो डाळ-भात खाणार नाही, पण निदान फ्राईड राईस तरी खाईल. पण नेहमीच बर्गर काय? सन्या हा झोपडपट्टीत वाढलेला मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यात ते सर्व गुण किंवा अवगुण आहेत. पण जेव्हा श्रेयस सन्याला घरात राहायची परवानगी देतो. त्यानंतर सन्या जो चित्रपटात अंदाजे १५ वर्षांचा दाखवलाय, तो श्रेयसच्या ऑफिसमध्ये हाफ पॅंट, टिशर्ट आणि त्यावर ब्लेझर घालून जातो. कहर म्हणजे त्याच्या डोक्यावर गजरा असतो. तो हे सर्व कशासाठी करतो? कारण ज्या कारणासाठी तो हे करतो, असं चित्रपटाच्या शेवटी कळतं, ते कारण खुप गंभीर आहे. 
विनोदनिर्मिती करण्यासाठी काही विनोदी प्रसंग मुद्दामून घडवून आणावे लागतात. अशी ही बनवा बनवी किंवा हिंदीतला चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमध्ये मुद्दामून विनोद घडवून आणला आहे. पण त्यात अतिरेकपणा नाही. बर्‍याचदा विनोदाचा अट्टाहास करताना अवखळपणा होतो. ते होता कामा नये.

सिनेमात श्रेयसची बायको सन्याला म्हणते "मी श्रीमंत घरची मुलगी म्हणून मला काम करायची सवय नाही. माझं आणि श्रेयसचं लग्न झालं तेव्हा श्रेयसकडे पैसे नव्हते, प्रेम होतं. पण आता पैसे आहेत, प्रेम नाही". पुढे ती म्हणते "माझं शिक्षण सुद्धा श्रेयस एवढंच झालंय. पण मला काम करायचं नव्हतं. माझं घर सांभाळायचं होतं" हा संवादातला विरोधाभास आहे. त्याचं कारण सांगतो. त्यांचा प्रेम विवाह झाला होता, तेव्हा श्रयसकडे पैसे नव्हते. तरी तिने त्याच्याशी लग्न केलं, घर सांभाळलं. म्हणजे नेमकं काय केलं? चित्रपटात तिला साधं जेवण बनवता सुद्धा येत नाही. म्हणून ती रोज बर्गर खायला घालते. श्रेयस श्रीमंत झाल्यावर तिने बर्गर खायला घातलं, पण श्रेयस गरीब असताना तिने काय केलं? असे विरोधाभास पटकथेतही आले आहेत. 

श्रेयसचा मित्र (उमेश जगताप) हा कॉलेजमध्ये शिकवतो. पण त्याचं चारित्र्य शुद्ध नाही. श्रेयस त्याच्याकडे सन्यापासून सुटकारा मिळवण्यासाठी मदत मागतो. तेव्हा तो मित्र त्याच्याकडे दारुची मागणी करतो. श्रेयस हा श्रीमंत माणूस. तरीही ते दिवसा ढवळ्या एका रानात दारु पितात. त्या रानाच्या आजूबाजूला रहदारी असलेल्या बिल्डिंग्स आहेत. श्रेयसच्या Medium close shot किंवा Wide shot मध्ये तर स्पष्ट बिल्डिंग दिसते. मग ते नेमकं कुठे असून दारु पितात? बार किंवा रेस्तरॉंमध्ये का जात नाही? कदाचित त्याला जे रहस्य सांगायचं आहे, त्यासाठी निवांत जागेची आवश्यकता आहे. पण ती जागा बसून दारु पिण्याची मुळीच वाटत नाही. सुहास शिरसाट (रात्रीस खेळ चालेमधला दत्ता) यांची एक विनोदी भूमिका या चित्रपटात आहे. ती त्यांनी चांगली रंगवलीय. पण त्यांच्या तोंडी एक गाणं दिलंय. त्या गाण्याच्या गायकाचा आवाज त्यांना अनुरुप वाटत नाही आणि लिप्सिंग सुद्धा चांगली झाली नाही. दुसरा मुद्दा असा की ती भूमिका अर्धवट राहते. सुहास शिरसाट यांच्या भूमिकेचा शेवट होत नाही. जसा गौरी कोंगेच्या भूमिकेचा होतो. एखादं महत्वाचं पात्र असेल तर त्या पात्राला न्याय देणं अपेक्षित आहे. असो. 

चित्रपटाची गाणी फारसा प्रभाव पाडत नाही. संजय खापरे श्रीमंत माणसाच्या भूमिकेत आहेत. ते एक चांगले अभिनेते आहेत. त्यांचे काम आपण सर्वांनी पाहिले आहे. पण इथे मात्र श्रेयस नावाचं पात्र जाणूनबुजून श्रीमंत असल्याचा अविर्भाव आणत आहे असं वाटतं. तरीही स्वार्थी आणि मग्रूर माणूस उभा करण्यात खापरेंना चांगलं यश आलं आहे. तसं सर्व अभिनेत्यांचं काम बरं झालंय. आता महत्वाचं पात्र म्हणजे डिस्को सन्या. सन्याच्या भूमिकेसाठी पार्थची निवड योग्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. पार्थने आता बालवयातून किशोरवयात प्रवेश केला आहे. कदाचित म्हणूनच की काय जी निरागसता त्याने आधीच्या चित्रपटात दाखवली होती, ती निरागसता त्याला डिस्को सन्यामध्ये दाखवता आली नाही. पण पार्थ हा चांगला अभिनेता आहे. तो सन्याच्या भूमिकेत उत्तम बसलाय. पार्थ कॅमेरासमोर अगदी सहज वावरतो, म्हणून त्याचं काम पाहायला मजा येते.  

सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे चित्रपटाचा सस्पेन्स मनाला पटकन पटत नाही. पण हा सस्पेन्स अनपेक्षितही आहे. हॅपी एंडिंगसाठी लेखकाला व दिग्दर्शकाला तो सस्पेन्स गरजेचा वाटला आहे. श्रेयस आणि सन्याच्या भांडणाला किंवा संघर्षाला टॉम आणि जेरीची उपमा दिली आहे. पण असं वाटतं की दोघांमधील संघर्ष जरा वेगळ्याप्रकारे, सहजतेने दाखवला असता तर बघायला मजा आली असती. तरीही काही ठिकाणी गंमत निर्माण होते. आपण या चित्रपटाला दोन स्टार्स देऊ. एकदंर हा सिनेमा ठिकाय. 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री   जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist. www.jayeshmestry.in

Click here to Top