1
 


Ekk AlbelaShekhar Sartandel
Writer/Director


Movie Review
मोठ्या स्वप्नांची कहाणी :लायकीपेक्षा मोठी नसतील.. तर ती स्वप्नं काय


Cast : Mangesh Desai as Bhagwan Dada, Vidhyadhar Joshi, Prasad Pandit, Swapnil Rajshekhar, Vighnesh Joshi, Shekhar Phadke, Shriram Kolhatkar, Arun Bhadsavle, Tejaswi Patil, Vidya Balan

Writer : Shekhar Sartandel & Amol Shetge
Screenplay & Dialogue : Shekhar Sartandel & Amol Shetge

मराठी माणसाने स्वप्नं पाहिली तर तो ती पूर्णत्वास नेतो. अनेक मराठी लोकांना मी बोलताना पाहिलंय की मराठी माणसाला धंदा करता येत नाही. मराठी माणूस हा आळशी असतो. काही संघटना आणि राजकीय पक्षांनीही मराठीचा मुद्दा उचलून धरला होता आणि आजही मराठी अस्मितेचं राजकारण होत असतं. आपल्यावर सतत अन्याय होतोय, असं जर एखाद्या समाजाला वाटत राहिलं तर तो समाज इतरांना दुषणे देण्यात धन्यता मानतो आणि मानसिक रुपाने दुर्बल होतो. माणसाला दुःखाची सवय पडली तर तो दुःखाला कवटाळून राहतो. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. गेल्या काही दशकांपासून मराठी माणूस या न्यूनगंडाखाली वावरत आहे. कारण त्याच्यावर अन्याय होतोय, हे त्याला पटवून दिलं गेलं आहे. पण या अन्यायाचा सामना दुसर्‍यांना दुषणे न देता, स्वतःच्या कर्तृत्वाने करायचा असतो. अन्याय कोणावर होत नाही? संकटे कोणावर कोसळत नाहीत? पण या संकटाचं रुपांतर जो संधीमध्ये करतो, प्रत्येक ’नाही"ला जो होकारात बदलतो तो अलबेला ठरतो.

ही कहाणी अशाच एका "अलबेला"ची आहे. अलबेला हा भगवान दादांचा गाजलेला पहिला सोशल सिनेमा आहे. या नावापुढे "एक" लावून "एक अलबेला" हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपट पाहायला जाताना आपल्याला वाटतं की हा भगवान दादांचा चरित्रपट आहे. पण चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा पूर्णपणे चरित्रपट नाही. "अलबेला" हा चित्रपट बनवण्यामागची ही कहाणी आहे, असंही नाही. इथेच प्रेक्षकांचा थोडासा गोंधळ उडतो. 

भगवान दादा अनावधानाने चित्रपट सृष्टीत आले आणि ऍक्शन सिनेमा करत करता त्यांनी अलबेला हा सोशन सिनेमा बनवला आणि भगवान दादा हे नाव भारतीय सिनेमासृष्टीत अजरामर झालं. ही कहाणी साधारण अशी आहे. चरित्रपट बनवताना बर्‍याचदा पटकथा व्यवस्थित लिहिली जात नाही. त्याचं कारण असं की ज्या व्यक्तीवर चरित्रपट बनवला जातो, त्या व्यक्तीची माहिती तुकड्या तुकड्याने मिळते. चित्रपटात प्रमाणापेक्षा अधिक सिनेमॅटिक लिबर्टी घेतली तर तो चरित्रपट होऊच शकत नाही. पण मिळालेली सुद्धा एकसंध नसते. त्यामुळे या चित्रपटाची पटकथाही सुसंगतपणे जात नाही. तरीही मला वाटतं की हा या चित्रपटाचा दोष नाही. कारण चित्रपट बनवताना लेखक व दिग्दर्शकाने ठरवलेलं आहे की त्याला काय दाखवायचंय. तुम्ही काय विचार करता ते लोकांना दाखवणं म्हणजे चित्रपट नव्हे. तर लोकांना काय दाखवावं, याचा विचार करणे म्हणजे चित्रपट. चित्रपटाची पटकथा तुकड्या तुकड्याने अगदी जलदगतीने पुढे सरकते. इंटरवलपर्यंत भगवान दादा एक सर्वसामान्य माणूस ते त्यांचं चित्रपटातील यशस्वी आगमन व ऍक्शनपटांमध्ये त्यांनी कमावलेलं नाव याविषयी धावती चर्चा आहे. इंटरवलनंतर मात्र फक्त अलबेला या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल चर्चा आहे. चित्रपट निर्माण करताना त्यांना झालेला मानसिक त्रास, आलेल्या अडचणी या अडचणींवर मात करुन चित्रपट कसा पूर्ण होतो व दोन आठवडे चित्रपट चालत नाही, पण नंतर मात्र चित्रपट अफलातून चालतो. हे सर्व टप्प्या टप्प्याने दाखवण्यात आलंय. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातले कलाकार. सर्व कलाकारांनी उत्तम काम केलंय. मंगेश नाईक यांनी भदवान दादा जीवंत केलेत. त्यांच्या अनेक छोट्या छोट्या हालचाली जसं हसताना एका बाजूचं गाल वर उचलणं, नाचताना खांदे उडवणं, चालण्याची लकब, डोळ्यांची हालचाल, भुवया वर खाली करणे या सर्व हालचाली मंगेश देसाईंनी अभ्यासपूर्ण केल्या आहेत. भगवान दादा म्हणजे डान्सींग हिरो, मंगेश यांनी त्यांचं नृत्यही आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. चित्रपटाचं दुसरं आकर्षण म्हणजे विद्या बालन. विद्या बालन ही जितकी सुंदर आहे त्याहीपेक्षा कैक पटीने ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे. प्रत्येक सिनेमात वेगळा अभिनय, म्हणजे जे पात्र ती साकारते, त्या पात्राला अनुसरुन अभिनय करणं, अर्थात पात्र जीवंत करणं हे विद्या बालनचं वैशिष्ट्य आहे. विद्याबाईंच्या रुपात गीता बालीला पाहताना एक वेगळाच आनंत मिळतो. परवा मी द्वारकानाथ सांझगीरी यांनी भवगान दादांवर लिहिलेला लेख वाचला. त्या लेखात भगवान दादांची पत्नी ही साध्वी (अर्थात पतिव्रता) होती, असा उल्लेख आहे. या पतिव्रतेची भूमिका तेजस्वी पाटीलने उत्तम साकारली आहे. आपल्या नवर्‍याबद्दलचा आदर तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतो. सिनेमामध्ये आपला नवरा इतर नायिकांसोबत रोमान्स करतो, हे पाहून ती रुसते, थोडीशी नाराज होते. पण जेव्हा भगवान दादा सांगतात की हे सगळं खोटं असतं, तेव्हा तिने तिच्या पतीवर ठेवलेला विश्वास तिने एक्स्प्रेशनमधून आणि डोळ्यांतून सुंदर दाखवलेला आहे. आपला पती भ्रमिष्ट झाला आहे, तेव्हा पतीविषयी वाटणारी काळजी, अलबेला सुपरहिट झाल्यांनतर ती आपल्या पतीकडे अभिमानाने पाहते, हे सर्व लूक जबरदस्त दिलेत. अर्थात ते दिग्दर्शकाने काढून घेतलेत हे विसरुन चालणार नाही. विद्याधर जोशी यांनी साकारलेला चंदू मेहता लक्षात राहतो. सी. रामचंद्र या महान संगीतकाराची भूमिका विघ्नेश जोशी यांनी उत्कृष्ट आणि सहज साकारली आहे. स्वप्नील राजशेखर यांनीही नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाय. राज कपूर यांच्या भूमिकेवर अधिक विचार झाला असता तर बरं झालं असतं. 

चित्रपटाचं दिग्दर्शनही गोड झालेलं आहे. शेखर सरतांडेल हे खुप साधे गृहस्थ वाटतात. पण दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी चांगली पार पाडली आहे. परंतु काही गोष्टीत घाई झाल्यासरखं वाटतं. भगवान दादा हे चाळीत राहत होते, परंतु चाळीचं वातावरण उलगडून दाखवलेलं नाही. भगवान दादांची श्रीमंतीही संवादातून व्यक्त होते, पण दृश्यांतून जाणवत नाही. तरीही दिग्दर्शक आपल्याला जुन्या काळात घेऊन जाण्यात यशस्वी ठरलेत. एक अलबेलाचं पार्श्व संगीत हा सुखद अनुभव आहे. विशेषतः जुन्या गाण्यावर आत्ताच्या कलाकारांना नृत्य करताना पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. शोला जो भडे, दिल मेरा धडके, भोली सुरत दिल के खोटे ही गाणी तर उत्तम शूट झालीत. या गाण्यावर मंगेश आणि विद्या मनमुरादपणे थिरकलेत. भगवान दादांचा रोल मंगेश देसाईंसाठीच बनला होता, असं आपल्याला चित्रपट पाहिल्यावर वाटतं. इतकी मेहनत मंगेश याम्नी भूमिकेसाठी भेतली आहे.

चित्रपटातले संवाद चित्रपटाला अनुसरुन आहेत. लायकीपेक्षा मोठी नसतील.. तर ती स्वप्नं काय कामाची, पाण्यात राहून माशाशी बेर करु नये असे अनेक उत्कृष्ट संवाद जुळून आले आहेत. उगाच डायलॉगबाजी केल्यासारखं वाटत नाही. चित्रपटाची लांबी कमी आहे. केवळ १ तास ३९ मिनिटात चित्रपट संपतो. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव पाडतो असं मला वाटतं. जर भगवान दादांचं संपूर्ण जीवन दाखवायचं नसेल तर चित्रपटाची लांबी फार नसावी हा निर्णय अतिशय योग्य आहे. पटकथा व्यवस्थित जमून आली नसली तरी ही एक चांगली कलाकृती आहे. भारतातला पहिला ऍक्शन हिरो, पहिला डान्सिंग हिरो, पहिला हॉरर सिनेमा काढणार्‍या भगवान दादांना ही श्रद्धांजली आहे. एक सर्व साधारण मराठी माणूस मोठी स्वप्न पाहतो, त्याच्या समोर अनेक अडचणी येतात, पण अडचणींना न डगमगता तो प्रकर्षाने संघर्ष करतो. विरोधकांची डोकी फोडण्यापेक्षा, स्वतःचं डोकं वापरुन यशस्वी होऊन सगळ्या विरोधकांचं तोंड बंद करतो. मला तरी वाटतं की हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहावा आणि आपल्या लायकीपेक्षा मोठी स्वप्नं त्याने पाहावी व ती पूर्ण करुन दाखवावी. आम्हाला मोठी स्वप्न पाहायला लावणार्‍या कै. भगवान आबाजी पालव यांना मानाचा मुजरा.
आपण या चित्रपटाला ४ स्टार्स देऊया.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री   लेखक : जयेश मेस्त्र

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.... . www.jayeshmestry.in

Click here to Top