1
 


pindadaan
गती नाही गत्यंतर नाही


Prashant patil
Director


Movie Review
Movie Review : पिंडदान:पिंडाला कावळा शिवलाच नाही


CAST: Siddharth Chandekar, Manava Naik, Paula Mcglynn, Madhav Abhyankar, Sanjay Kulkarni
DIRECTION: Prashant Patil
Story : Avinash Ghodke
Screenplay & Dialogues : Avinash Ghodke

पिंडदान, a mystical love story. म्हणजे एक गूढ प्रेम कथा... ही प्रेमकथा खरोखरच गूढ आहे. पण ती पडद्यावर व्यवस्थित दाखवता आलेली नाही. आशुतोष (सिद्धार्थ) आणि रुही (मनवा) लंडनमधील चॅनल 6 मध्ये काम करत असतात. आशुतोषची आई त्याला फोन करुन सांगते की त्याच्या आजीचं पिंडदान करायचं आहे. त्याच्या वडीलांचा या प्रथेवर विश्वास नव्हता. पण आता आशुतोषने पिंडदान करायला हवं असा हट्ट त्याची आई धरते. ती असा हट्ट का धरते हे कळत नाही. त्याच दरम्यान चॅनल 6 चे संपादक त्यांना पिंडदान या प्रथेवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी भारतात पाठवतात. हे लॉजिक अजूनही कळलं नाही. पाश्चात्यांना इथल्या काही प्रथेत रस आहे. पण एकदम पिंडदान या प्रथेत का रुची निर्माण होते हे स्पष्ट झालेलं नाही. असो. भारतात आल्यावर भारताची संस्कृती, त्यांना भेटलेले संत पुरुष रुद्र बाबा आणि ऍना (पॉला) यांच्या भोवती हा चित्रपट फिरत राहतो.

ही सस्पेन्स कथा आहे आणि त्यातलं सस्पेन्स शेवटपर्यंत राखलंय हीच काय ती चित्रपटाची जमेची बाजू आहे. पण बर्‍याच ठिकाणी चित्रपट अगदी बालीश वाटतो. चित्रपटाची कथा म्हणजे स्टोरी लाईन एका परिच्छेदाचीही नसेल असं वाटतं. चित्रपटाच्या पटकथेत तर काहीच दम नाही. हॉटेल ते नदीचा घाट आणि पुन्हा नदीचा घाट ते हॉटेल इथपर्यंतच पटकथा मर्यादित राहिली आहे. कोणतीही व्यक्तीरेखा तुमच्या मनावर छाप पाडत नाही. पॉला ही जरा इतरांपेक्षा वेगळी दिसते, म्हणजे ती गोरी मेम आहे म्हणून चित्रपटात तिची व्यक्तीरेखा आपल्या लक्षात राहते. लंडनमधील चॅनल 6 चं जे ऑफिस दाखवलंय त्यापेक्षा आपल्याकडच्या नगरसेवकांचं कार्यालय चांगलं वाटतं. त्यांच्या स्टुडिओमध्ये जी शुटिंग चाललेली असते ती पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही. आशुतोष आणि रुहीमध्ये शारिरीक संबंध निर्माण झाल्यानंतर आशुतोष रुहीपासून लांब का पळतो ते सुद्धा कळायला मार्ग नाही. चॅनल 6 वाल्यांना जर भारतात डॉक्यूमेटरी बनवायची होती तर त्यांनी केवळ दोन माणसं पाठवणे ही कल्पनाशक्ती सुद्धा भयानक आहे. त्यात आशुतोष हा दिग्दर्शक असूनही ऍंकरींगची जबाबदारी स्वीकारतो. भारतात आल्यानंतर त्यांना तुकाराम नावाचा ड्रायव्हर भेटतो. हे पात्र लिहिताना लेखकाने काय विचार केलाय मला कळलंच नाही बुवा. हा तुकाराम ऑल राऊंडर आहे. म्हणजे तो ड्रायव्हर आहे, गाईड आहे, हॉटेलचा स्टाफ आहे, वेटर आहे, त्यांचा पर्सनल नोकरही तोच आहे. मुळात त्या हॉटेलमध्ये तो काम करीत नसताना त्याच्या तिर्थरुपांचं हॉटल असल्यासारखं तो वावरतो. एवढ भव्य आणि प्रशस्त हॉटेल, पन एकही स्टाफ नाही? त्या हॉटेलमध्ये इतर कुणीही राहत नाही? कमाल आहे ना? ज्या हॉटेलमध्ये ते येतात, तो मुळात जुना वाडा होता म्हणे. पण आता तो वाडा एका मद्रास्याने खरेदी केला व त्याचं हॉटेलात रुपांतर केलं. सुरुवातीला हॉटेलचा मॅनेजर तुकारामला सांगतो की हॉटेलचं रिनोव्हेशन सुरु आहे आणि प्रत्यक्षात मात्र तो एकटाच काम करत असतो. दुसरी चूक हॉटेलचं रिनोव्हेशन आहे असं सांगितल्यानंतर लगेच म्हणतो दोनच रुम्स रिकामी आहेत. हे कसं शक्य आहे? एकतर तो राजेशाही वाडा, त्यात त्याचं रिनोव्हेशन सुरु आहे आणि तरीही दोन रुम्स रिकाम्या आहेत? मला कठोर होऊन टिका करायची नाही. मी टिका करण्यासाठी रिव्ह्यू लिहित नाही. पण चित्रपट बनवणार्‍यांनी किमान भान संभाळून बनवावा अशी अपेक्षा असते. चित्रपट हीट होईल की फ्लॉप, हे प्रेक्षक ठरवतील. पण चित्रपटाचा संदर्भ तरी लागला पाहिजे. 

रुद्र बाबांचं पात्र भलंतचं सस्पेन्स ठेवण्यात आलेलं आहे. त्याची गरज नव्हती. सुरुवातीला आशुतोषकडे फक्त लूक (रागात?) देणारे रुद्र बाबा, चित्रपटाच्या शेवटी भसाभसा बोलू लागतात. तेच आधी बोलले असते तरीही काहीच बिघडलं नसतं. ऍनाचं पात्र सस्पेन्स ठेवलं हे मी समजू शकतो. कारण तिच्यावरच संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे. पण ते पात्रही ढिम्म वाटतं. कारण तिला जे आशुतोषला सांगायचंय ते भेटल्या भेटल्या पहिल्या सीनमध्ये सांगितलं असतं तरी काय फरक पडला असता. पण चित्रपट वाढवता आला नसता, एवढंच. चित्रपट वाढवण्यासाठी ऍनाचं जपून ठेवलेलं सस्पेन्स यामुळे कथा सुद्धा फसली आहे. ऍनाचा रोल करणारी पॉला सुंदर आहे. ती मराठीही सुंदर बोललीये. मुळात मनवा नाईक सुद्धा सुंदर हिरोइन आहे. पण दिग्दर्शकाने पॉलाकडे अधिक लक्ष दिलंय असं वाटतं. चित्रपटातले संवाद वाईट आणि बालीश आहेत. एका सीनमध्ये स्टॅला नावाची आशुतोषच्या घराची मालकीण (हिच्या घरी आशुतोष पेइंग गेस्ट म्हणून राहत असतो) स्पष्ट म्हणते "हर्टलेस डॉटर (Heartless Daughter)". पण चित्रपटाच्या अखेरीस या संवादाची लिंक लागत नाही. संवाद लिहिताना ही सर्वात मोठी झालेली चूक आहे. कारण हा चित्रपटाचा महत्वाचा संवाद आहे. अनेक ठिकाणी संवाद लेखकाने कहरच केली आहे. नदीच्या घाटाकडचे भरमसाठ सीन्स घेतले आहेत. त्या सीन्समध्येही नाविन्य नाही. ती पॉला नुसती होडी घेऊन नदीत जाते आणि पुन्हा बाहेर येते. कधी कधी नदीच्या किनारे दोघं गप्पा मारत बसतात. पण चित्रपटाचा ज्या पद्धतीने शेवट केला आहे, त्याचा आणि या सर्व सीन्सचा काहीही संबंध नाही. पॉलाचं वागणंही चित्रपटाच्या कथेला अनुसरुन नाही. त्यामुळेच सगळाच सावळा गोंधळ झाला आहे. अधिक लिहिणार नाही. नाहीतर सबंध चित्रपट सांगण्याची पाळी माझ्यावर येईल. आणि रिव्ह्यूकर्त्याने कधीही संपूर्ण कथा सांगायची नसते अशि प्रथा कुणीतरी घालून दिली आहे. ती आपण पाळूया. 

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद यावर जर जास्त विचार केला असता तर मला वाटतं नक्कीच एखादी सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळाली असती. कारण चित्रपटाचा प्लॉट बरा आहे. अगदीच नवीन आहे असं म्हणणार नाही. पण त्या प्लॉटला उत्तम लेखनाची साथ मिळाली असती तर किमान तो चित्रपट पाहण्याजोगे झाला असता. चित्रपटात स्टार कास्ट आहे. काही दिग्गज कलाकारही आहेत. सर्वांनी आपापला अभिनय बरा केला आहे. पण कोणतंही पात्र प्रभाव पाडत नाही. कारण ते लेखनात उतरलेलं नसल्यामुळे दिग्दर्शनातही आलेलं नाही. चित्रपटाचं संगीत ठीक आहे. सिद्धार्थ, मनवा यांनीही चागलं काम केलंय. अधिक काय लिहिणे? यावेळेस तरी पिंडाला कावळा शिवलेला नाही. 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री     लेखक : जयेश मेस्त्र

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.... . www.jayeshmestry.in

Click here to Top