1
 


CheaterAjay Phanasekar
writer/Director


Movie Review
Cheater:प्रेक्षकांनाच फसवणारा चीटर


प्रेक्षकांनाच फसवणारा 'चीटर'

Cast: Vaibhav Tatwawdi, Pooja Sawant, Hrishikesh Joshi, Suhas Joshi, Asavari Joshi, Vrushali Chavan
Written and Directed by: Ajay Phansekar

चार्ली चाप्लीनने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की "माझी व्यक्तीरेखा माझ्या सहकलाकारांमुळेच अधिक खुलून दिसते. चित्रपटात माझे सहकलाकार नॉर्मल वागत असतात आणि मी एकटाच विनोदी भूमिका करीत असतो. म्हणून इतरांपेक्षा मी वेगळा भासतो". चार्लीला जर मी सिनेजगताचा देव म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही आणि माझ्या या वक्तव्यावर माझे कलावंत आणि वाचक मित्र आक्षेप घेणार नाहीत, असे मी गृहीत धरीत आहे. चीटर सिनेमा पाहताना मला चार्ली चाप्लीनची आठवण येत होती. पूर्वी मराठी इंडस्ट्रीला विनोदाने पछाडले होते. प्रत्येक चित्रपटात विनोद निर्मितीची स्पर्धा असायची. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी एकेकाळी विनोदवीर म्हणून इंडस्ट्री गाजवलेली आहे. विनोदी अभिनय करण्याची दोघांची पद्धत वेगळी होती आणि ती लोकांना आवडायची. आजही लक्ष्या आणि अशोक सराफांचे चित्रपट पाहताना मजा येते. चीटर हा विनोदी सिनेमा आहे. इथे प्रत्येक पात्राला विनोद करण्याचा अट्टाहास आहे आणि या अट्टाहासामुळे धड विनोदही चांगला जमला नाही आणि चित्रपटाची कथाही भरकटत गेली आहे. 

अभय अग्निहोत्री (वैभव) हा पुण्यातील नामवंत पुरोहिताचा मुलगा. पण तो नास्तिक आहे. त्याची नास्तिकता ताणली गेली नसली तरी काही संवादातून हे स्पष्ट होतं की तो देवालाही मानत नाही आणि भूतालाही मानत नाही. त्याला पुण्यात चीटर या नावाने ओळखलं जातं. लोकांना शेंड्या लावणं हाच त्याचा धंदा आहे. मृदुला (पूजा) ही मॉरिशसमधून पुण्याला आलेली असते. तो तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि तिच्याशी लग्न करुन तिच्या पैशावर मजा मारण्याचा त्याचा प्लान असतो. पण अचानक त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग निर्माण होतात जेणेकरुन स्वतःच योजलेल्या प्लानमध्ये तो फसत जातो. नास्तिक असलेल्या अभयच्या आयुष्यात भूतांची एंट्री होते. आणि मग त्यातून घडणारी गंमत म्हणजे हॉरर कॉमेडी(?) फिल्म चीटर.

सुहास जोशी, हृषिकेश जोशी, आसावरी जोशी यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. तरी हा चित्रपट आपल्याला नाराज करतो. कारण चित्रपटात विनोद निर्मितीची अतिशयोक्ती केली आहे. सुहास जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीला अशा रुपात पाहवत नाही. ह्रषिकेश जोशी यांच्या तोंडी सेकंद-सेकंदाला विनोदी संवाद आहेत. पण ते ऐकून हसायला तर येत नाही. उलट वैतागच येतो. वैभव तत्ववादी हा चांगला हिरो आणि अभिनेता आहे. हिरो आणि अभिनेता यात फरक आहे. चांगला अभिनेता हिरो होईल हे सांगता येत नाही आणि हिरो हा चांगला अभिनय करेल असं देखील ठासून संगता येत नाही. वैभवने बाजीराव मस्तानीमध्ये साकारलेली चिमाजी अप्पांची भूमिका मला फार आवडली होती. कारण सबंध चित्रपटात बेअरींग सांभाळणारा तोच एक होता. बाजीरावच्या भूमिकेतील रणवीर मात्र काहीही उद्योग करीत सुटला होता. असो. मराठी चित्रपटात यंग, डॅशींग व सिक्स पॅक वगैरे जे काही असतं, ते सर्व असणारा वैभव हा एक गुणी नट आहे. पण चीटर सिनेतालता वैभव फारसा प्रभाव पाडत नाही. पूजा सावंत नेहमीप्रमाणे सुंदर दिसली आहे. तिच्या अभिनयाबाबत मला फारशी चर्चा करायची नाही. कारण चित्रपट जर स्त्रीप्रधान नसेल तर हिरोइन केवळ शो पुरत्याच मर्यादित असतात. त्यांचं सुंदर आणि आकर्षक दिसणं हेच काय ते पाहण्यास योग्य असतं. सौंदर्य न्याहाळणं ही सुद्धा एक कला आहे. असो

चित्रपटात काही स्पेशल इफेक्ट आहेत. पण त्यात काहीही स्पेशल नाही. वटवागूळ, चित्रविचित्र भूतांची तोंडं ज्या प्रकारे दाखवली आहेत त्यात काहीही अर्थ नाही. उलट अनेक चित्रपटांची ती कॉपी वाटते. आजीला दिसणारी वटवागूळांचं, घरात जाणवणारं भूताचं अस्तित्व आणि नंतर सारंगीची एंट्री यात तारतम्य नाही. उगाच स्पेशल इफेक्टच्या नादात ते दृश्त समाविष्ट केले असावे. सुहास जोशी आणि आसावरी जोशी यांचे वैभवसोबत रोमान्स करतानाचे दृश्य विचित्र वाटतात. वृशाली चव्हाणने आपली भूमिका उत्तम साकारली आहे. सबंध चित्रपटात तिच एकटी सिरीयस असल्यामुळे तिची भूमिका लक्षात राहते. सारंगीचा आत्मा पाळीपाळीने प्रत्येकाच्या शरीरात का प्रवेश करतो हे कळतच नाही. चित्रपटातील गाणी ठीक आहेत. पण गाणी चित्रपटाला पुढे नेत नाहीत. म्हणून कथा रेंगाळत राहते. चीटर हा चित्रपट "चीटर" या नावाला साजेसाही नाही. अर्थात सिनेमा प्रेक्षकांना चीट करतो यात वाद नाही. इंटरवलनंतर कथा पुष्कळ भरकटते. कशाचा कशाला ताळमेळ राहत नाही. विनोद, हॉरर, सूड, प्रेम अशा विविध गोष्टीत कथा गुदमरुन जाते. पटकथाही बर्‍याच ठिकाणी बाळबोध झाली आहे. उगाच विनोदाचा अतिरेक करण्याच्या नादात चित्रपट पूर्णपणे अयशस्वी झालाय. वर मी चार्ली चाप्लीनचं उदाहरण दिलेलं आहे. सर्वच पात्र विनोदी दखवण्यापेक्षा एखाद दुसरं पात्र विनोद निर्मीती करीत आहे आणि इतर पात्र त्या पात्राला सपोर्ट करत आहे अशा प्रकारे काही दाखवता आलं असतं तर चित्रपट पाहण्यात थोडी गंमत आली असती. पण सध्या सगळीकडे विनोदाचा मारा केला जातोय. पण यामुळे प्रेक्षक घायाळ होत आहेत, याचं भान कुणालाही नाही.  
रात्र आरंभ सारखा चांगला चित्रपट देणारे अजय फणसेकरांना चीटर या सिनेमाला न्याय देता आलेला नाही. तरी आपण या चित्रपटाला दीड (१, १/५) स्टार्स देऊया.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री      लेखक : जयेश शत्रुघ्

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.... . www.jayeshmestry.in

Click here to Top