1
 


Sairat
A Trip of a Showman


Nagraj Manjule
Writer - Director


Movie Review
सैराट:Trip of a Showman


 

सैराट

A Trip of a SHOWMAN - Nagraj Manjule..

सैराट चित्रपटाची बरीच चर्चा चालू आहे. सोशल मिडिया सध्या सैराटच झालाय असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट एका विशिष्ट जातीवर टिका करणारा आहे असं म्हटलं जातंय. पण ते खोटं आणि चुकीचं आहे. हा चित्रपट जातीवर टिका करणारा नाही. ही मुळात प्रेम कहाणी आहे. सैराटचा review लिहिताना त्याचा मथळा काय असावा याबद्दल मी विचार करत होतो. "एका तिकीटात दोन चित्रपट", "एक दुजे के लिये + कयामत से कयामत तक + आणि असे बरेच चित्रपट = सैराट" किंवा "जुना माल नव्या पॅकींगमध्ये" इ. शिर्षक या लेखाला द्यावे, असा विचार मी करत होतो. पण पुन्हा एकदा मी शांतपणे विचार केला. चित्रपटातील जमतील तेवढे प्रसंग आठवले आणि ठरवलं की या लेखाला "The Showman Nagraj Manjule" हे शिर्षक द्यायचं. जर मराठी सिनेमात सुद्धा Bollywood एक genre लोकप्रिय झालंच आहे तर आपलाही एक showman असावा.

सैराट चित्रपटाच्या कथेत कोणतेही नाविन्य नाही. हा विषय आपण अनेक वर्षापासून पाहत आलो आहोत. अगदी भारतातील सगळ्या भाषेतील चित्रपटांनी हा विषय हाताळलेला आहे. विषय अगदी साधा आहे. किशोरवयीन मुलगा आणि मुलगी, दोघं प्रेमात पडतात, मग त्यांना जग ठेंगणं वाटू लागतं. उज्वल भविष्याचे स्वप्न रंगवू लागतात. ते स्वप्नात हरवून जातात. पण नंतर त्यांना वास्तवाचं भान होतं. कारण मुलीचा बाप व्हिलन आहे याचा त्यांना साक्षात्कार होतो. मग आपलं प्रेम मिळवण्यासाठी ते घरच्यांशी काय तर जगाशीही भांडायला तयार होतात. अशी जी साधारणपणे प्रेम कहाणी असते. तशीच प्रेम कहाणी सैराटमध्ये आहे. पण एक मात्र म्हणावं लागेल की सैराटचं प्रेजेंटेशन थोडं वेगळं आहे. शीव खेरा यांचं ब्रीदवाक्य आहे "winners don’t do different things; they do things differently" तर हे differently काय आहे तेच सैराटचं USP. पहिली गोष्ट म्हणजे लोकेशन्स. अनेक दिग्दर्शकांनी विचारही केला नसेल अशा करमाळ्यासारख्या तालुक्यात चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे. लोकशन्सचं सौंदर्य आपल्याला चित्रपटात दिग्दर्श्काच्या दृष्टीकोनातून पाहायला मिळतं. चित्रपटाची थीम म्हणून पक्षांचा थवा वापरला असल्याचं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा. गावरान भाषा ऐकायला बरी वाटते. त्यातील हलकेसे विनोदही गंमत आणतात. विशेषतः शहरात वाढलेल्या माझ्यासारख्या लोकांना ही भाषा ऐकणे म्हणजे गंमतच आहे. तीसरी गोष्ट म्हणजे कलाकार. जवळ जवळ सर्वच कलाकार नवोदित आहेत. पण नागराज यांनी त्यांना काय खायला घातलं माहित नाही. सर्वांनी उत्तम म्हणता येणार नाही. परंतु स्क्रीनसाठी जेवढा अभिनय लागतो तेवढा अभिनय केला आहे आणि त्यात फारसा नवखेपणा जाणवत नाही. नाहीतर हिंदीत असे बरेच नट-नट्या इतकी वर्ष काम करूनही, स्टार म्हणून मिरवत असूनही अभिनयाच्या नावाने बोंबच असते. पण नागराज मंजुळे यांनी सर्व नविदोत कलाकारांकडून चांगला अभिनय करुन घेतला आहे. गुरु जे सांगतो ते सच्च्या शिष्यालाच कळतं आणि कोणत्या शिष्यात काय गुण आहेत हे खर्‍या गुरुलाच कळतं. ही किमया या चित्रपटात दिसून येते. कॅरेक्टरायजेशन उत्तम झालंय. कोणती व्यक्ती कोनत्या पात्राला उत्तम बसेल याचं उत्तम भान उत्तम दिग्दर्शकाला असतं.

चित्रपटाचा हिरो परश्या (आकाश) हॅंडसम आहे. त्याने गावरान भाषा जोपासूण शुद्ध मराठी भाषेचा सराव केला तर करिअर उत्तमच आहे. त्याच्या लूकमध्ये एक प्रकारची निरागसता जाणवते. जी या चित्रपटासाठी अत्यंत गरजेची होती. त्याचं काम उत्तम झालं आहे. चित्रपटात लक्षात राहते ती हिरोइन अर्ची (रिंकू). ती खर्‍या आयुष्यात शाळकरी मुलगी आहे. पण तिची देहबोली प्रौढ असल्यामुळे ती चित्रपटात शाळकरी वाटत नाही. तिचं वागण्या-बोलण्यात एक ऐट आहे. श्रीमंत घराण्यातली मुलगी शोभून दिसली आहे. तिच्या भावाची भुमिका करणार्‍या मुलाने चांगली बेअरिंग पकडली आहे. वयाने लहान असूनही श्रीमंत बापाच्या मुलाच्या चेहर्‍यावर जो माज असायला हवा तो शेवटपर्यंत दिसतो. परश्याचे दोन्ही मित्र सल्या आणि लंगड्या यांनी छान काम केलंय. विशेषतः लंगड्याची भूमिका करणारा मुलगा मुळीच नवोदित वाटत नाही. त्याचे हावभाव, बोलणं, कॅमेरासमोर वावरणं यामध्ये सहजता आहे. तशी सहजता सगळ्याच कलाकारांमध्ये दिसली आहे. पण हे लंगड्याचं पात्र विशेष लक्ष्य वेधून घेतं. चित्रपटातील गाणी मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट गाणी आहेत असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण अशाप्रकारची गाणी याआधीच स्वतः अजय-अतूल यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी फार वेगळी गाणी बनवलीत असं नाही. पण हा टिकेचा विषय होऊ शकत नाही. कारण एखाद्याची ती स्टाईल असू शकते. चित्रपटाची गाणी प्रेक्षणीय झाली आहेत. सैराटच्या गाण्यांनी लोकांना वेड लावलंय. सैराटची सगळी गाणी कानाला सुख देणारी आहेत. सीनेमॅटोग्राफी फार छान झाली आहे. सगळे सीन्स उत्तम शूट झालेत. तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत सैराट आपल्याला फारसा नाराज नाही करत. पण सगळ्यात महत्वाची खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाची लांबी. चित्रपट आजच्या काळानुसार खुप मोठा आहे. इंटरवलच्या आधीचा काही भाग कमी केला असता तरी चित्रपटाच्या गाभ्याला धक्का लागला नसता. पण मंजुळेंसारख्या दिग्दर्शकाला ते करावंसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. कारण फॅंड्री त्या मानाने खुपच लहान चित्रपट आहे. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगीन की चित्रपट खुप मोठा असला तरी प्रेक्षक कंटाळत नाहीत. का? हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. कदाचित याचं कारण नागराज मंजुळेंचं प्रेजेंटेशन असावं. 

नागराज मंजुळे यांचा फॅंड्री कुणी पाहिला असेल तर सैराट पाहून त्याला आश्चर्य वाटू शकतं. कारण फॅंड्री हा कलात्मकतेकडे झुकणारा सिनेमा आहे आणि सौराट हा अतिकमर्शियल सिनेमा आहे. हा इतका बदल मजुळेंनी का स्वीकारला असेल. कदाचित मी हे सुद्धा करु शकतो, असं दाखवण्यासाठी असेल. असो, चित्रपट कमर्शियल असला तरी त्याला मंजुळे टच आहे. प्रत्येकाची दिग्दर्शनाची एक शैली असते. तशी वेगळी शैली नागराज मंजुळे यांची आहे. दिग्दर्शानासोबत त्यांनी पटकथा लिहिली आहे व भरत मंजुळे यांच्यासोबत संवाद लेखनातही योगदान दिले आहे. त्यामुळे मंजुळे टच प्रत्येक पटकथेत आणि संवादात जाणवतो. संवाद सुटसुटीत आहेत. ते ओघाने येतात असं वाटतं. जरी चित्रपट फारसा फिल्मी असला तरी पटकथा चांगली लिहिली आहे. काही सीन्स तर फारच गंमत आणतात. एक छोटासा ५ वर्षांचा मुलगा हिरोने दिलेली चिठ्ठी हिरोइनला देतो व हिरोइन जे उत्तर देईल ते हिरोला सांगतो. असा सीन कदाचित इतर चित्रपटात लिहिला गेला असेल. पण तो इतका गंमतीदार झाला नसणार असं मी खात्रीने सांगतो. अजून एक साधारण सीन मला सांगावासा वाटतो, पटरीवरुन ट्रेन धावत असताना जो आवाज होतो त्या आवाजावर हिरो आणि त्याचे मित्र वेड्यासारखी नाचतात. ही पण एक गावरान गंमत आहे.  

मंजुळेंकडून फिल्मीपणा करण्याच्या नादात काही चुका पण झाल्या आहेत. पण त्या चुका सहाजिक आणि क्षम्य आहेत. हिरो-हिरोइनचं एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं कर्मर्शियल चित्रपटासाठी फार महत्वाचं असतं. तसले सीन्स सुद्धा अंगावर रोमॅन्स (रोमांच नव्हे) आणतात. चित्रपटाचा पुर्वाध फिल्मीपणाने व्यापलेला आहे. इंटरवल नंतरचा चित्रपट वेगळा आहे. त्यात दाहक वास्तवता आहे. पण ती वास्तवता कयामत से कयामत तक या चित्रपटात किंवा इतर चित्रपटात आधीच दाखवली आहे. पण ती दाखवताना वेगळेपणा मंजुळेंनी जपला आहे. पोरं पळून गेली. पण लग्नानंतर दुनियादारी प्रेमावर हवी होते. प्रेमात दुरावा येतो अशा सगळ्या गोष्टी एकामागून एक घडत जातात आणि शेवट येऊन ठेपतो. तेव्हा आपल्याला हा नागराज मंजुळेंचा चित्रपट आहे हे प्रकर्षाने जाणवतं. शेवटच्या सीनमध्ये लहान बाळाची पडणारी पावलं काळजात चर्रर्रर्रर्रर्र करुन जातात. आपण चित्रपट पाहतोय की वास्तवात जगतोय याचं भान आपल्याला राहत नाही. आपले डोळे कधी पाणावतात हे आपल्यालाही कळत नाही.  

या चित्रपटाचे समिक्षण लिहिताना मी बरेच शब्द खर्ची केले आहेत. तरी जाता जाता मला एका वाक्यात या चित्रपटाविषयी सांगावेसे वाटते. "चित्रपटाची सुरुवात होताच चित्रपटगृहात हशा पिकतो आणि चित्रपट संपताच सगळ्यांचे डोळे पाणावतात." यापेक्षा कमर्शियल चित्रपटांकडून अजून काय अपेक्षित असतं. हा चित्रपट हिंदी कमर्शियल चित्रपटाच्या तुलनेत चांगला चित्रपट आहे. चित्रपटातली मेसेज किंवा सामाजिक बांधिलकी वगैरे सोडा. पण मला वाटतं नागराज मंजुळे हे शोमॅन आहेत. प्रेक्षकांची नाडी ओळखणार्‍याला व एक सुंदर कलाकृती (त्यात काही त्रुटी असू शकतात) निर्माण करणार्‍याला शोमॅन म्हणतात. जुनाच विषय नव्या पद्धतीने दाखवून त्यांनी लोकांना सैराट केलं. सर्व कलाकार, टीम व नागराज मंजुळेंसाठी आपण या चित्रपटाला साडे तीन स्टार्स देऊ.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री  

 

Jayesh Mestry

9967796254

 

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    Jayesh Mestry

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter, Editor, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.... www.jayeshmestry.in

Click here to Top