1
 


रेती
मुठीतून निसटणारी


देवेन कापडणीस
लेखक


सुहास भोसले
दिग्दर्शक


Movie Review
रेती:मुठीतून निसटणारी


रेती

जळजळीत सत्य मांडणारा पण Bollywood मसाला मारून

कलाकार : किशोर कदम, शशांक शेंडे, चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी, सुहास पळशीकर, गायत्री देशमुख, संजय खापरे
लेखक : देवेन कापडनीस
दिग्दर्शक : सुहास भोसले

आपण मिडियाच्या माध्यमातून रेती माफियांविषयी ऐकत असतो. पण हा नेमका काय प्रकार आहे, हे आपल्याला माहित नसतं. रेतीचा वापर शहरांमध्ये अधिक होतो. पण ही रेती कुठून येते, रेती मिळवण्यासाठी माफिया काय काय करतात, या मध्ये कोण कोण गुंतलेलं असतं या सर्व प्रश्नांची उत्तरं रेती या चित्रपटा आहे. 

मराठी चित्रपटात फार झगमगाट नसतो. मराठी सिनेमाचा बजेट फार नसतो. मराठी चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे विषय. कमी खर्चात उत्तम चित्रपट म्हणजेच मराठी सिनेसृष्टी. लेखक देवेन कापडनीस आणि दिग्दर्शक सुहास भोसले यांनी असाच प्रयत्न केला आहे. पण उत्तम विषयावर निर्माण केलेले चित्रपट उत्तमच असतील असं म्हणता येत नाही. रेती चित्रपटाचा विषय जरी चांगला असला तरी चित्रपट टिपिकल बॉलिवूड स्टाईलचा पुढे सरकतो. चित्रपटाची कथा ठीक आहे. त्यात कोणतीही नाविन्यता नाही. पटकथा फार चांगली झाली नाही. या चित्रपटात बघण्यासरखं जर काही असेल तर कलाकारांचा अभिनय. 

चिन्मय मांडलेकर, किशोर कदम व शशांक शेंडे या तीन दिग्गज कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. संजय खापरे, गायत्री देशमुख, विद्याधर जोशी यांनीही आपापली भुमिका चांगली वटवली आहे. पण तरीही चित्रपटात बरीच कमतरता आहे. यामध्ये बॉलिवूडसारखा मसाला आहे. हा चमचमीत मसाला जर टाळला असता व चित्रपटाच्या विषयाला धरुन पटकथा लिहिण्यात आली असती तर एक उत्कृष्ट चित्रपट आपल्याला पहायला मिळाला असता. 

गजानन म्हात्रे (शशांक शेंडे) व त्याचा सहकारी किसन (किशोर कदम) यांच्यामधील हा संघर्ष आहे. अनेक वर्षापासून म्हात्रे वाळू व्यवसायावर एकछत्री राज्य करीत असतो. त्याला किसनची साथ लाभलेली असते. पण किसनला मोठं होण्याची स्वप्न पडू लागतात. एका बिल्डरकडून त्याला मुंबईत वाळू पोहोचवण्याची ऑफर येते. पण यासाठी त्याला म्हात्रेशी वैर पत्करावं लागतं. किसनचा उजवा हात शंकर्‍या (चिन्मय मांडलेकर) जो ट्रक ड्रायव्हर आहे, त्याच्या मदतीने किसन म्हात्रेचं साम्राज्य उध्वस्त करण्याचे बेत आखू लागतो. अशी एकंदर चित्रपटाची कथा आहे. चित्रपटातील सर्व कलाकार हे कसलेले कलाकार आहेत. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपटात उणीवा नाहीत. या चित्रपटात संजय खापरे समाजसेवकाच्या भुमिकेत आहे. पण ती भुमिका फारशी प्रभाव पाडत नाही.  कथा पुढे ढकलण्यासाठी या पात्राचा वापर केला आहे असं वाटत राहतं. काही सीनमध्ये हे पात्र उगाच वेळ खातं. चित्रपटकर्त्यांना बर्‍याच विषयांना हात घालायचा होता. जसे पर्यावरण आपत्ती, वाळू चोरी, जल प्रदुषण, गावकर्‍यांना होणारा त्रास, प्रेम, विरह इ. म्हणून चित्रपट भरकटत जातो. चित्रपट एका विषयावर स्थिर राहत नाही. चित्रपटातील गाणी सुद्धा चांगल्या दर्जाची नाहीत. आज काल चित्रपटात आयटम सॉंग टाकण्याचं टूम आहे. ते या चित्रपटातही आवरता आलेलं नाही. चिन्मय मांडलेकर आणि गायत्री देशमुख यांच्यावर चित्रीत केलेलं एक रोमॅंटिक गाणं म्हणजे एखाद्याचं पोट भरलेलं असतानाही त्याला आग्रह करुन त्याच्यावर पोटदुखीची पाळी आणणे असंच आहे. चित्रपटाची लांबी आधीच जास्त होती. त्यात हे गाणं नकोसं वाटतं. पण एका वेगळ्या विषयाला हात घालणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ते धडस देवेन कापडनीस आणि सुहास भोसले यांनी केले आहे. एक वेगळा विषय आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यासाठी आपण या चित्रपटाला आपण दोन स्टार्स देऊ.  

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

www.jayeshmestry.in

    जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist...

Click here to Top