1
 


Phuntroo
Fun-True


Sujay Dahake
Writer - Director


Movie Review
Phuntroo:Fun-Tech


नव्या पिढीतली वैज्ञानिक प्रेम कहाणी
फुंतरु

फुंतरु हा सिनेमा कॉलेज लाईफवर आधारीत आहे. तरी सुद्धा हा सिनेमा अतिशय वेगळा आहे. कॉलेज लाईफवर आधारीत हल्लीच दोन येऊन गेले. दुनियादारी आणि क्लासमेट. पण फुंतरु या चित्रपटात उगाच निर्माण केलेली पटकथा किंवा टाळ्या मिळवण्यासाठी उगाच लिहिलेले संवाद नाहीत. हा चित्रपट पाहताना आपल्याला अतिशयोक्ती दिसून येत नाही. शेवटपर्यंत इंजिनीअरींग कॉलेजचं वातावरण जाणवतं. 

चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. इंजिनीअरींग कॉलेजमध्ये फर्स्ट इअरचा मुलगा वीरा (मदन देवधर) अनयाच्या (केतकी) प्रेमात पडतो. वीरा हा अलौकिक बिद्धिमत्ता असलेला, पण विचित्र वृत्तीचा विद्यार्थी आहे. तो बर्‍याचदा वैज्ञानिक भाषेत बोलतो. अनयाला प्रपोज करताना तो अशीच विचित्र भाषा वापरतो. अनयाला त्याच वागणं आवडत नाही. ती त्याच्या प्रेमाला धुडकावून लावते. मग तो अनयासारखी दिसणारी हॉलॉग्राम तयार करतो. त्याच्या या प्रोजेक्टचं नाव आहे फुंतरु... पुढे काय होतं हे जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल तर चित्रपट पहा.

प्रेम, भावना, विज्ञान, तंत्रज्ञान, मैत्री या सर्वांना मिलाप म्हणजे फुंतरु होय. सुजय डहाके यांनी लेखक व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरुवातीपासूनच कथा पकड घेते. सुजय यांचा आजच्या पिढीचा अभ्यास चांगला आहे. या पिढीतली मुलं कसं बोलतात याचा उत्तम अभ्यास डहाकेंनी केला आहे. सुंदर छायांकन, कथा, संवाद, पटकथा, संगीत, अभिनय व त्याला लाभलेली तंत्रज्ञानाची जोड यामुळे सिनेमा उत्तम झाला आहे. विज्ञानाच्या माध्यमातून उलगडत जाणारी नाती, प्रेम सबंध हा चित्रपटाचा विषय आहे. मजेशीर बाब म्हणजे या सिनेमात अनेक संदर्भ येतात. नारळीकर, भालचंद्र नेमाडे, न्यूटन, प्लॅटो, हिंदुत्व, कम्युनिज्म, नास्तिकता अशा अनेक गोष्टींचा यात उल्लेख आहे. पण तरीही या सर्व गोष्टी उगाच आल्यात असं वाटत नाही. कथेशी यांच्या उत्तम संबंध लेखकाने जोडलेला आहे. चित्रपटाचा पहिला भाग इंजिनीअरींग विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व आधुनीकता दर्शवतो. इतर कॉलेज लाईफच्या चित्रपटांप्रमाणे रटाळ पटकथा यात नाही. म्हणून नाविन्यता जाणवते. पण या सर्व संदर्भांमुळे आणि वैज्ञानीक भाषेमुळे कदाचित यातील संवाद प्रेक्षाकांना लगेच समजणार नाही. 

चित्रपटाचा दुसरा भाग हा थोडासा मंद गतीने जातो व दुसरा भाग अधिक वैज्ञानिक झाला आहे. पण फुंतरु हा प्रोजेक्ट नेमका काय आहे? जर तो हॉलॉग्राम आहे की एखाद्या व्यक्तीसारखी दुसरी सजीव व्यक्ती निर्माण करणारा प्रोजेक्ट आहे? हे काही कळत नाही. चित्रपटात हॉलॉग्राम स्वतःस अपग्रेड करतं. हॉलॉग्राम दिसण्यासाठी व गायब होण्यासाठी वीराने एक यंत्र बनवलंय. पण बर्‍याचदा हॉलॉग्राम स्वतःहून प्रकट होतं व स्वतःहून दिसेनासं होतं. हे शक्य आहे का? याचं उत्तर वैज्ञानिक किंवा विज्ञान शाखेचे विद्यार्थीच देऊ शकतात. माझ्यामते ही लेखक व दिग्दर्शकाने घेतलेली लिबर्टी आहे. संपूर्ण चित्रपटात खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाचा अंत. चित्रपटाचा अंत सोयीस्कर आणि सर्वसामन्य चित्रपटासारखाच आहे. यापेक्षा वेगळी एंडींग करता आली असती. असो. सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. केतकी नेहमीप्रमाणे सालस व सुंदर दिसली आहे. पण या चित्रपटात तिची बोल्ड अदा अनुभवायला मिळते. मदन देवधरने वीराची भुमिका उत्कृष्ट साकारली आहे. त्याचे हावभाव, बोलण्याची लकब यामुळे पात्र निर्मित्ती मस्तच झाली आहे. यांच्या बरोबर शिवराज वैचाल, रोहित निकम, ऋतुराज शिंदे, शिवानी रंगोळे, अंशुमान जोशी या युवा कलाकारांनी व मोहन आगाशे आणि श्रीरंग देशमुख यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांनी आपली भुमिका जबरदस्त साकारली आहे. चित्रपटाची तंत्रज्ञानाची बाजू तर उत्तमच झाली आहे. सर्वच बाबतीत हा सिनेमा उजवा ठरतो. 

तर सुजय डहाके यांच्या शाळा या चित्रपटापेक्षा किती तरी पटीने फुंतरु हा चित्रपट उत्कृष्ट आहे. एक वेगळा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. मराठीमधील उत्तम विज्ञान चित्रपट म्हणायला हरकत नाही. सुजय डहाके यांनी मराठीत विज्ञान चित्रपटाची उत्तम ओपनींग केली आहे. पुढे मराठीमध्ये अनेक उत्तमोत्तम विज्ञान चित्रपट निघतील यात शंका नाही. आपण या चित्रपटाला साडे तीन स्टार्स देऊ...

 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Jayesh Mestry

9967796254

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    Jayesh Mestry

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top