1
 


पोलीस लाईन
एक पूर्ण सत्य, अपूर्ण कथा


राजू पार्सेकर
लेखक - दिग्दर्शक


Movie Review
Police Line (Marathi):पूर्ण सत्य. अपूर्ण कथा


Cast :

Santosh  Juvekar, Jayant Savarkar, Satish Pulekar, Vijay Kadam, Pramod Pawar, Pradip Kabre, Jayvant Wadkar, Satish Salagare, Jayvant Patekar, Swapnil Rajshekhar, Pradip Patvardhan, Nisha Parulekar.

 

Director :   Raju Parsekar

Story :  Dipak Shrerang Pawar

Screenplay and Dialogue : Amar Parkhe, Raju Parsekar, Sandesh Lokegoankar

 

पोलिस लाईन, एक पूर्ण सत्य दिग्दर्शक राजू पार्सेकर त्यांचा नवा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची महत्वाची बाजू म्हणजे तगडी स्टारकास्ट. अनेक दिग्गज कलाकारांनी सजलेला असा हा सिनेमा आहे. आपल्याला वर्दीतले पोलिस दिसतात. पण वर्दीपलीकडचे पोलिस आपल्या माहित नसतात. पोलिसांच्या वागणुकीमुळे आपण त्यांना चागलं किंवा वाईट म्हणत असतो. पण ते सुद्धा माणूस आहेत, त्यांनाही घर आहे, संसार आहे, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना असतात तशा अडचणी त्यांच्याही आयुष्यात असतात. किंबहुना त्या आपल्यापेक्षा अधिक असतात. ड्यूटी बजावताना त्यांच्यावर येणारे दडपण, कुटुंबासोबत असलेला सततचा तणाव, पोलिसांना स्वतःचं घर नसतं,  नोकरी संपल्यानंतर त्यांन घर रिकामी करावं लागतं. म्हणून नाईलाजाने त्यांना वासरदारांनाही पोलिसात भरती व्हावं लागतं. जेणेकरुन डोक्यावरचं छप्पर शाबूत राहिल. पोलिसांच्या जीवनाचे दाहक वास्तव दाखवण्याचे प्रामाणिक प्रयत्न राजू पार्सेकर यांनी केले आहे. याविषयी कुणाच्याही मनात किंतू नसावा. पण हा सिनेमा कथेच्या बाबतीत मात्र पकड धरत नाही.

बाळा (संतोष जुवेकर) २१ वर्षांनी भारतात (मुंबईत) परततो. तो एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतोय. मुंबईच्या रस्त्यावर गाडीतून प्रवास करताना त्याला पोलिस वसाहत दिसते. तो गाडीतून उतरतो व वसाहतीत प्रवेश करतो आणि त्याच क्षणी तो भूतकाळात प्रवेश करतो. बाळा हा पोलिसाचा मुलगा व पोलिसाचा भाऊ. पोलिस लाईनमध्ये लहानाचा मोठा झाला. पोलिस लाईनीत आढळणारी बिनधास्त मुलं इथे आपल्याला पहायला मिळतात. पोलिस लाईन ही एका व्यक्तीची कहाणी नसून सबंध पोलिस डिपार्टमेंटची कहाणी आहे. म्हणून या सीनेमाला कोणताही एखादा नायक नाही, नायिका नाही किंवा खलनायकही नाही. बाळा हे चित्रपटातील एक महत्वाचं पात्र आहे. पण तो चित्रपटाचा हिरो नाही. तो चित्रपटाचा सुत्रधार आहे. पोलिसांना वेळेवर पगार मिळत नाही, रिटायर असतील तर वेळेवर पेंशन नाही. कमी पगारात मोठं कुटुंबं पोसण्याची जबाबदारी म्हणून वाममार्गाला जावून लाच घ्यावी लागते. मोडकळीस आलेली जुनी बिल्डींग, त्यामुळे होणारा अपघात, सततच्या ताणामुळे आणि कामामुळे बायकोसाठी द्यायला वेळ नसतो म्हणून घरात होणारा तणाव. गुंडांसोबत होणारी बाचाबाची व त्यातून पोलिसांच्याच जीवाला कसा धोका निर्माण होऊ शकतो, लाच घेताना पकडल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर त्याची होणारी दुर्दशा वगैरे वगैरे आदी दाहक वास्तवाचे दर्शन राजू पार्सेकर यांनी घडवले आहे. पण लेखकांना व दिग्दर्शकांना सर्वांनाच समान अधिकार द्यायचा होता म्हणून त्यांनी एक अशी विशिष्ट कथा न घेता, सर्व पात्रांवर फोकस केला आहे. पण यामुळे कथा विखुरली जाते. म्हणून ही कथा अपूर्ण राहते. जर ही कथा बाळाची किंवा बाळाच्या परिवाराची असती आणि इतर पात्र जर सहाय्यक म्हणून आले असते तर ही एक परिपूर्ण कथा झाली असती.  

चित्रपट पाहताना अजून एक प्रश्न मनाला सतावतो तो असा की बाळा लहानाचा मोठा पोलिस लाईनमध्ये झाला, त्याला मिळालेली नोकरी सुद्धा सामान्य असते. पण त्याच्या आयुष्यात असं काय घडतं? ज्यामुळे तो परदेशात जातो व उच्च पदावर काम करतो. चित्रपट सुरु झाल्यापासून संपेपर्यंत याविषयी साधा उल्लेखही झाला नाही. त्यामुळे बाळाची कथा अधूरीच राहते. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत प्रदीप कबरे, विजय कदम, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, सतीश पुळेकर, स्वप्नील राजशेखर या सर्वांचे सीन्स अगदी अंगावर येतात. अभिनयाच्या बाबतीत कुणीही कसर सोडलेली नाही. परब मामा आपल्या पत्नीची शारीरीक गरज भागवू शकत नाही म्हणून त्यांची झालेली कुचंबणा प्रदीप कबरे यांनी उत्तम प्रकारे दाखवली आहे. मुलगा अपंग असताना आपला मुलगा एक ना एक दिवस बरा होईल अशी अपेक्षा बाळगणारा व कधीही लाच न घेणारा हवालदार प्रमोद पवार यांनी जबरदस्त साकारला आहे. आधी लाचखोर आणि नंतर दारुडा अशी भुमिका स्वप्नील राजशेखर यांनी अतिशय सशक्तपणे निभावली आहे. विजय कदम, जयवंत वाडकर, सतीश पुळेकर यांसारख्या सर्व दिग्गज अभिनेत्यांनी अक्षरशः प्राण ओतले आहे. राजू पार्सेकर यांचे दिग्दर्शनही मस्त झाले आहे. 

हे सर्व जरी खरं असलं तरी इतक्या लोकांची कथा दोन तासात पडद्यावर दाखवण्याचा मोह चित्रपटकर्त्यांना आवरता आला असता तर चित्रपट अजून चांगला झाला असता. हा चित्रपट म्हणजे केवळ पोलिसांच्या जीवनातील दाहक वास्तव आहे. पण यावर कोणताही उपाय चित्रपटात सुचवण्यात आलेला नाही. असो. चांगलं दिग्दर्शन आणि अप्रतिम अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पहायला हवा. या चित्रपटाला आपण अडीच स्टार देऊ. 

 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Jayesh Mestry

9967796254

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

 

    जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top