1
 


Jatin Wagle
Director


Ambar Hadap
Writer


Ganesh Pandit
Writer


Movie Review
बंध Nylonचे :उसवलेले बंध..


'उसवलेले' बंध नायलॉनचे

 

CAST: Subodh Bhave, Mahesh Manjrekar, Medha Manjrekar, Shruti Marathe, Sunil Barve, Sanjay Narvekar, Pranjali Parab

DIRECTION: Jatin Satish Wagle

Screenplay : Ambar Hadap, Ganesh Pandit, Jatin Wagle

Story : Ambar Hadap, Ganesh Pandit, Jatin Wagle

 

आयुष्यात पैशांपेक्षा नाती महत्वाची असतात. प्रसिद्धी, पैसे कमवण्याच्या नादात आपण नाती हरवून बसतो. अशा प्रकारचे विषय अनेक चित्रपटांमधून मांडले गेले आहेत. ते बर्‍यापैकी यशस्वीही ठरले आहेत. साधारण अशाच प्रकारची नात्यांमध्ये गुंतलेली कथा म्हणजे बंध नायलॉनचे. देवदत्तला (सुबोध भावे) शिक्षणासाठी बाहेर गावी जायचं असतं. म्हणून पैशांची सोय करण्यासाठी तो आपल्या वडिलांना म्हणजे रघुनाथ जोगळेकर (महेश मांजरेकर) यांना गावची छोटीशी जमीन विकायला सांगतो. पण वडील जमीन विकत नाही. म्हणून मुलगा वडीलांवर रागावतो व घर सोडून निघून जातो. पण देवदत्तची जिद्द व मेहनत याच्या जोरावर तो यशस्वी होतो व युएसमध्ये जातो, स्वतःचा व्यवसाय निर्माण करतो, लग्न करतो त्याला एक गोंडस मुलगी होते. चित्रपट सुरु होतो तेव्हा तो एका प्रकल्पाच्या निमित्ताने भारतात आलेला असतो. देवदत्तची मुलगी सारा हिला आजी आजोबांना भेटायचं असतं. म्हणून तो त्याच्या गावी जाऊन आई-वडिलांना घरी येण्यास सांगतो. पण त्याचा मुजोरपणा व व्यापारी वृत्ती पाहून आई-वडील येण्यास तयार होत नाही. साराच्या मनात आजी-आजोबांविषयी असलेली भावना तीव्र होते.  देवदत्तची बायको अनिता (शृती मराठे) देवदत्तला सांगते की काही करुन साराची आजी-आजोबांशी भेट घडवून आणली पाहिजे. नाहीतर तिच्या मनावर परिणाम होईल. तेव्हा देवदत्तचा मित्र रवीची (सुनील बर्वे) एंट्री होते आणि रवी साराच्या आजी-आजोबांसारखे दिसणारे खोटे आजी-आजोबा आणतो. इथे चित्रपटाला एक नवीन वळण प्राप्त होते. देवदत्तचा मित्र रवी हे पात्र सुद्धा अजून बळकट करता आलं असतं.  

चित्रपट जरी नात्यांच्या गुंगागुंतीवर अवलंबुन असला तरी यात थोडसं वेगळेपण आहे. ते वेगळेपण काय आहे? व साराचे खोटे आजी-आजोबा नेमके कोण आहेत? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पहावा. मराठी चित्रपटाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर चित्रपटाचा प्लॉट जरी नव्या प्रकारचा असला तरी त्याला दिलेली ट्रिटमेंट जुनीच आहे. ही चित्रपटाची कमकुवत बाजू आहे. चित्रपट प्रामुख्याने दोन भागात विभागलेला आहे. एक भाग म्हणजे देवदत्त आणि त्याचं कुटुंबं व दुसरा भाग देवदत्तचं प्रकल्प. देवदत्तचे कुटुंबाशी असलेले संबंध, आई-वडिलांसोबत असलेला तणाव चित्रपटात कळतो. पण त्याचं प्रकल्प ही काय भानगड आहे हे शेवटपर्यंत कळतच नाही. देवदत्त हा श्रीमंत व हुशार दाखवलेला आहे. पण तो भारतात प्रकल्प उभारण्यासाठी येतो तेव्हा त्याच्याकडे खरी किंवा अंतिम योजना सुद्धा नसते. प्रकल्पाचं काही काम तो त्याच्या खोट्या वडीलांकडून करुन घेतो व गावकर्‍यांची जमीन हडप करणे या खेरीज तो काहीच करत नाही. देवदत्तची व्यावसायिक बाजू लेखकांनीच व्यवस्थित मांडलेली नाही. त्यामुळे ती दिग्दर्शनात सुद्धा उतरलेली नाही. सर्वात अधिक खटकणारी बाब म्हणजे चित्रपटातील एक पात्र राम (संजय नार्वेकर). तो या कथेचा भाग का आहे? या कथेमध्ये राम नेमकं काय करतो हेच लेखकांना कळलेलं नाही. भाषणबाजी करण्यापलीकडे या पात्राला कथेमध्ये काहीच अर्थ नाही. हे पात्र कथेत नसतं तरी कथा पुढे ढकलता आली असती. संजय नार्वेकरांनी अभिनय जरी चांगला केला असला तरी लेखनातील गोंधळामुळे हे पात्र कथेमध्ये गोंधळच निर्माण करतं. खोट्या आजी-आजोबांसोबत वावरताना साराच्या वागणुकीत झालेला बदल, जो संवादातून जाणवतो, तो चित्रीकरणातून जाणवत नाही. लेखक, दिग्दर्शकांनी कोणतीही गोष्ट तपशीलात दाखवलेली नाही. बर्‍याच गोष्टी संवादातून जाणवतात. चित्रपट ही साहित्याची पुढची पायरी आहे. त्यामुळे महत्वाच्या गोष्टी चित्रीकरणातून जाणवल्या पाहिजेत. केवळ शब्दांतून नव्हे. लेखक व दिग्दर्शकांना कोणता संदेश द्यायचा आहे हे कळतं. पण त्यासाठी त्यांनी निर्माण केलेली कथा किंवा पटकथा तो संदेश पोहोचवण्यास यशस्वी ठरत नाही. सारा ही चित्रपटाची केंद्र बिंदू आहे. पण साराच्या भुमिकेती प्रणाली वयाने खुपच लहान किंवा अभिनय क्षेत्रात नवखी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून किंवा अभिनयातून गांभीर्य जाणवत नाही. त्यामुळे देवदत्तला झाले पश्चाताप व्यर्थच ठरतो.  

चित्रपटाची जमेची बाजू चित्रपटाची स्टार कास्ट आहे. महेश मांजरेकर व मेधा मांजरेकर यांनी चित्रपटात प्रथमच एकत्र अभिनय केला आहे. दोघांचेही सुर चांगले जुळले आहेत. पण ज्याप्रकारे मेधा मांजरेकर खरी आजी आणि खोटी आजी या दोन्ही भुमिका वेगवेगळ्या पद्धतीने साकारतात. तसं महेश मांजरेकर यांच्या बाबतीत दिसून येत नाही. खरे आजोबा आणि खोटे आजोबा यात फारसा फरक जाणवत नाही. मांजरेकर हे एक मुरलेले कलाकार असूनही त्यांना हे कसं साध्य झालं नाही, हा प्रश्न आपल्याला सतवतो. सुबोध भावे, सुनील बर्वे या दिग्गज कलाकारांनी आपापली भुमिका चांगली निभावली आहे. मराठीसृष्टीला "राधा ही बावरी"च्या माध्यमातून ज्ञात झालेली व दक्षीण भारतीय चित्रपटांत बोल्ड भुमिका करणारी शृती मराठे ही हाऊज वाईफच्या भुमिकेत दिसली आहे. तिने सुद्धा चांगला अभिनय केला आहे. साराच्या भुमिकेतील चिमुरडी प्रणाली परब गोड दिसण्यापेक्षा फारसं काही चित्रपटात करत नाही. चित्रपटात जर काही विशेष असेल तर साराचे खोटे आजी-आजोबा. या एकाच गोष्टीसाठी चित्रपट पहावासा वाटतो. चित्रपट निर्माण करणार्‍यांनी थोडासा अजून विचार केला असता तर एक उत्तम कलाकृती तयार झाली असती. असो. एक वेगळा प्रयत्न म्हणून चित्रपट पहायला हरकत नाही. आपण या चित्रपटाला अडीच स्टार देऊ. 

 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Jayesh Mestry

9967796254

 

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top