1
 


702 Dixit
You may visit once!


Ruturaj Dhalgade
Screenplay


Hrishikesh Koli
Dialogue


Movie Review
702 Dixit:एकदा भेटण्यास हरकत नाही.


702 Dixit's
एकदा भेट द्यायला हरकत नाही

Cast : Vijay Andalkar, Gauri Nigudkar, Pallavi Patil, Vikram Gokhale, Jaywant Wadkar, Ruchi Jail

Director : Shankh Rajyadhyaksha

मराठीमध्ये रहस्यमय चित्रपट फारच कमी बनतात. पुर्वी एक काळ असा होता की मराठी चित्रपट म्हणजे विनोदी चित्रपट. पण आता मराठीत विविध विषय हाताळले जात आहेत. शंख राजाध्यक्ष यांनी एक वेगळा प्रयत्न केला आहे. काव्या (गौरी निगुडकर) आणि यश दिक्षित (विजय) हे तरुण जोडपं त्यांची मुलगी रेवा हिच्यासोबत पुण्यात राहत आहेत. प्रामाणिक आणि सभ्य गृहस्थ अशी यशची ओळख आहे. पण एक दिवस यशची हि ओळख पुसली जाते. आशा यश दिक्षितच्या बालकनीतून खाली कोसळते व जागच्याजागी दगावते. आशा यशची मोलकरीण. तरुण आणि सुंदर मुलगी. जेव्हा आशा खाली पडली तेव्हा घरात फक्त यश असतो. आशाचे वडील रावजी यशवर खुनाचा आरोप करतात. सर्व पुरावे यशच्या विरोधात आहेत. इन्स्पेक्टर पाटील (जयवंत वाडकर) यशला ताब्यात घेतात. काव्या यशला भेटण्याची विनंती करते पण पाटील तिला भेटू देत नाही. काव्या यशच्या मैत्रिणीला फोन करुन बोलवते. रीया पंडीत (पल्लवी पाटील) हि यशची बालपणाची मैत्रिण. रीया काव्याला मदत करते व तिच्या सांगण्यावरुन ती यशचं वकीलपत्र घेते. पण यश खरोखर निरपराध आहे का? जर यश निरपराध असेल तर असं कोण आहे ज्याची दिक्षितांच्या सुखावर वाईट नजर आहे? यश खरोखर सभ्य आहे की त्यानं सभ्यपणाचा मुखवटा परिधान केलाय? जर यश सभ्यपणाचा मुखवटा परिधान केला आहे तर यशने आशाचा खुन का केला? केवळ वासनेपोटी? या सगळ्या प्रश्नात गुंतून ठेवणारा 702 Dixit's हा चित्रपट आहे.

चित्रपटाची कथा चांगली आहे. शेवटपर्यंत काय होईल याची उत्सुकता आपल्याला लागून राहते... एक चांगला रहस्यमय थ्रिलर या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळेल. पण पटकथेमुळे चित्रपट हळूवार पुढे सरकतो. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून चित्रपट उलगडत असला तरी आणि रहस्य शेवटपर्यंत टिकून राहिलं असलं तरी सीन्स अंगावर रोमांच आणत नाहीत. पटकथा अतिशय सर्वसामान्य आहे. त्यामुळे चित्रपट चांगला असूनही मजा येत नाही. इन्स्पेक्टर पाटीलचं वागणं सुरुवातीपासूनच खटकतं. बिस्कीट खाणं हा पाटीलचा छंद आहे. पाटील उगाच प्रत्येकाचा अपमान करत राहतो. कॅरेक्टर बिल्डिंग हे या मागचं कारण असलं तरी प्रत्येकालाच उलट सुलट बोलणं खटकतं. संपूर्ण चित्रपटात पोलिस गांभिर्याने खुनाचा तपास करीत नाही. ज्या घराच्या बालकनीतून आशा उडी मारते त्या घरात तपास करतानाचा एकही सीन दाखवलेला नाही. यशची वकील रीया पंडीत मात्र यशच्या घरी जाऊन तपास करते. हा तर्क काही कळत नाही. संपूर्ण चित्रपटात पोलिस फक्त नावापुरते आहेत असं वाटतं. इन्स्पेक्टर पाटीलला माहिती असतं की यशचं लग्न झालंय. तरीही तो यशला तुझं लग्न झालं आहे का? असं विचारतो. हि संवाद लेखनात झालेली त्रुटी आहे. चित्रपटाचे संवाद सुद्धा फार पकड घेत नाहीत. यशची मुलगी ८ - ९ वर्षांची दाखवली आहे. पण मोठ्यांच्या संवादावरुन तिला हे कळत नाही की तिच्या बाबाला पोलिसांनी पकडून नेलंय. हे काही मनाला पटत नाही. जेव्हा तिला आपल्या बाबांबद्दल कळतं तेव्हा ती अतिशय सौम्य प्रतिक्रीया देते. ८ - ९ वर्षांच्या मुलीला घडलेल्या घटनेचं गांभीर्य कळायला हवं. ते दाखवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरलेत. यशच्या सोसायटीतले रहिवाशी अभिनय करीत नसल्यामुळे त्यांच्यासोबतचे सर्व सीन्स खाली पडतात. त्यांना कुणीतरी बोलायला सांगितले आहे म्हणून ते बोलत आहेत असं वाटतं. त्यांच्या जागी चांगले कलाकार घेतले असते तर बरं झालं असतं. मराठी सिने-नाट्यसृष्टीत नावारुपाला न आलेले उत्तम कलाकार आहेत. याची दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी नोंद घ्यायला हवी होती. असो. यशच्या भुमिकेतील विजय या अभिनेत्याने चांगली भुमिका निभावली आहे. पण त्याच्या अभिनयाला फार वाव देण्यात आला नाही. फ्लॅशबॅकमध्ये काही सीन्स त्याच्या पदरात पडलेत. गौरी निगुडकर आणि पल्लवी पाटील यांनी आपली भुमिका छान निभावली आहे. पल्लवी पाटीलच्या एंट्रीला विशेष महत्व देण्यात आलं आहे. म्हणून ती चित्रपटात उठून दिसते. चित्रपटाचं संगीत बरं आहे. चित्रपटात दोन गाणी आहेत. कथा वेगळी आहे. कथा आणि परफॉर्मेंस यामुळे चित्रपट पहावासा वाटतो. चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही. शंख राजाध्यक्ष हे एडिटर आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते दिग्दर्शक झालेत. त्यांचा हा प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय. दिक्षित कुटुंब बिल्डिंगच्या ७ व्या मजल्यावर ७०२ क्रंमाकाच्या फ्लॅटमध्ये राहत असतात. ७ व्या मजल्याच्या ७०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये कोणतं रहस्य दडलंय हे जाणून घ्यायचंय? तर चित्रपट पहायला हवा. एकदा पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. आपण या चित्रपटाला अडीच स्टार देऊ. 


लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Jayesh Mestry

9967796254

 

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    जयेश शत्रुघ्न मेस्

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top